संदीप आडनाईककोल्हापूर : इयत्ता १० वी नंतर व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खासगी विनाअनुदानित महाविद्यालयाचे अभ्यासक्रम राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राज्य सरकारच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतून वगळून त्यांच्या शिक्षणाच्या संधीही हिरावून घेतल्या आहेत. महत्वाचे म्हणजे बार्टी आणि सारथी संस्थांतील लाभार्थी विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी उत्तीर्ण आणि ६० टक्के गुण असण्याची अट घातली आहे. याचा फटका या विद्यार्थ्यांना बसणार असून, सरकारने त्यांना उच्च शिक्षणापासून दूर ठेवण्याचाच कट केला आहे.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत वसतिगृहातील प्रवेश आणि संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या या समाजासाठी आरक्षित जागा पूर्ण क्षमतेने भरत नाहीत, हे वास्तव आहे. असे असताना लाभार्थी विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी उत्तीर्ण आणि ६० टक्के गुण असण्याची अट घातली आहे. त्यामुळे किमान गुणांची मर्यादा ४५ टक्क्यांपर्यंत खाली आणावी, यामुळे आधार योजना, स्वयंम योजनेचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळू शकेल, अशी मागणी ओबीसी बहुजन पार्टीने केली आहे.
शासन आदेश
- १३ डिसेंबर २०२३ : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना.
- १९ डिसेंबर २०२३ : राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी योजना.
- १८ जून २०२४ : भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना.
- ११ मार्च २०२४ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना.
एकतर रडतखडत इयत्ता १० वीपर्यंत मजल मारणाऱ्या या विद्यार्थ्यांना १० वी नंतरच्या पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, तसेच वसतिगृह प्रवेशासाठी ६० टक्के गुणांचे निकष लावण्याचा शासन निर्णय काढून त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. याशिवाय या अभ्यासक्रमांना बारावी उत्तीर्ण असण्याची अट घालून त्यांना वसतिगृहातील प्रवेशापासूनही दूर ठेवले आहे. - सयाजी झुंझार, संघटक, ओबीसी बहुजन पार्टी, कोल्हापूर.