कोल्हापूर : येथील शाहू स्टेडियमवर फुटबॉल सामन्यादरम्यान दिलबहार तालीम आणि पाटाकडील तालीम यांच्यात झालेल्या हाणामारी व तोडफोडप्रकरणी दोन्ही तालमीच्या सुमारे ३४ कार्यकर्त्यांना मंगळवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पाटाकडील तालमीचा खेळाडू पोलीस कॉन्स्टेबल रोहित शेखर ठोंबरे (वय २५, रा. मंगळवार पेठ) याचा या प्रकरणात सहभाग स्पष्ट झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी रात्री उशिरा त्याला निलंबित केले. या हाणामारीत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अटक केलेली नावे अशी, पाटाकडील तालीम- पोलीस कॉन्स्टेबल रोहित ठोंबरे, जय जाधव, संपत जाधव, अश्विन गडकरी, दीपक थोरात, अमित जाधव, अमोल पाटील, रोहन ठोंबरे, सुमित जाधव, संतोष भोसले, पराग हवालदार, अभिजित नलवडे, वृषभ ढेरे, जुनेद हकीम, सूरज हकीम, तौसिफ हाकीम, महेश पाटील, संग्राम शिंदे, सागर कांदेकर, मिथुन मगदूम, रोहित दरवान, उमेश पाटील, करण (सर्व रा. मंगळवार पेठ), नीलेश चव्हाण (रा. उत्तरेश्वर पेठ), महेश यादव (कसबा बावडा), ‘दिलबहार तालीम’- राजू शशिकांत पाटील, बंटी कावणेकर, अक्षय साळोखे, सुधर्म ऊर्फ टिल्लू शिंदे, रतन राजाराम पाल, उमेश साळोखे, अभिषेक विश्वास सावंत, विश्वजित दिलीप पाटील, शैलेश जाधव अशी त्यांची नावे आहेत. धीरज बलुगडेसह अन्य संशयित पसार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. दिलबहार तालीम विरुद्ध पाटाकडील तालीम या दोन संघांत सोमवारी शाहू स्टेडियमवर फुटबॉल सामन्यादरम्यान जोरदार हाणामारी झाली. यावेळी संतप्त दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी जोरदार दगडफेक करून चारचाकीसह काही दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान केले तसेच एका दुकानाचीही तोडफोड केली. याप्रकरणी पाटाकडील तालमीच्यावतीने रुपेश किशोर सुर्वे (वय २६, रा. टेंबे रोड) याने २० ते २५ तर ‘दिलबहार’च्या वतीने सचिन श्रीपती पाटील याने ४० समर्थकांच्या विरोधात फिर्याद दिली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्यरात्रीपासून आरोपींची धरपकड सुरू केली होती. मंगळवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी सुमारे ३४ समर्थकांना अटक केली. तोडफोडीमध्ये सचिन पाटील याच्या दुकानाचे, जुगनू कांबळे यांच्या रिक्षाचे, तर रुपेश सुर्वे याच्या घरासमोरील जादू ग्रुप या डिजिटल मंडळाचा फलक, कार, दुचाकी असे मिळून सुमारे दोन लाख किमतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, काही संशयित पसार झाले आहेत. त्यांची माहिती अटक केलेल्या आरोपींकडून पोलीस घेत होते.कारवाई न करण्यासाठी दबाव‘दिलबहार’ आणि ‘पाटाकडील’ तालमीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करू नये, यासाठी राजकीय दबाव पोलिसांवर येत होता; परंतु पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना दिले होते. त्यानुसार मोहिते यांनी व्हिडिओ चित्रीकरण, वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्या व छायाचित्रांचा आधार घेत कार्यकर्त्यांची नावे शोधून काढून गुन्हा दाखल केला.‘करवीर’च्या कॉन्स्टेबलकडून ठोंबरेची पाठराखण पोलीस कॉन्स्टेबल रोहित ठोंबरे याला वैद्यकीय तपासणीसाठी रात्री साडेसातच्या सुमारास आणले. यावेळी करवीरचे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले त्याचे दोन कॉन्स्टेबल मित्र याठिकाणी आले. त्यांनी त्याला ‘स्पेशल चहा’ आणून दिल्याचे समजते. तसेच वैद्यकीय तपासणी होईपर्यंत ते याठिकाणी थांबून होते. हुल्लडबाजी नडलीपोलीस कॉन्स्टेबल रोहित ठोंबरे हा नुकताच पोलीस दलामध्ये भरती झाला होता. त्याची नियुक्ती गडहिंग्लज पोलीस ठाण्यात आहे परंतु महिन्यापूर्वी त्याची पोलीस मुख्यालयाकडे तात्पुरती नियुक्ती झाली होती. पोलीस असल्याने आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, या अविर्भावात तो दिवसभर होता; परंतु दुपारी त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉ. शर्मा यांनी रात्री उशिरा त्याला तडकाफडकी निलंबित केले. अशी झाली कारवाई भा.दं.वि.स.कलम १४३/१४७/१४८/१४९ गर्दी व मारामारी (५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन दंगामस्ती करणे) ४५१/४५२/३२३/५०४/५०६/४२७ (दुकानात शिरून तोडफोड करणे, धक्काबुक्की व शिवीगाळ)
कॉन्स्टेबलसुद्धा मारामारीत
By admin | Published: April 29, 2015 12:49 AM