कोल्हापूर : जिल्हा रुग्णालयातील (सीपीआर) कैदी वॉर्डात उपचार घेत असलेला आरोपी सोमप्रशांत पाटील (रा. बाणेर, पुणे) याच्यासह गुन्हेगारांसोबत मद्यसेवन करून पार्टी करणाऱ्या पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदारासह कॉन्स्टेबलला खात्यातून बडतर्फ केल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी मंगळवारी दिली. संशयित फौजदार बाबूराव ज्योतीराम चौगुले (वय ५६, रा. मंगळवार पेठ), पोलिस कॉन्स्टेबल मारुती भाऊसो पाटील (४५, रा. पाचगाव, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. पुण्यातील गजा मारणे या टोळीतील सोमप्रशांत पाटील हा सीपीआर येथील कैदी वॉर्डात एक महिन्यापासून मूत्रपिंडाच्या त्रासामुळे उपचारासाठी दाखल आहे. दि. १५ जून रोजी संशयित सहायक फौजदार बाबूराव चौगुले, कॉन्स्टेबल मारुती पाटील यांच्यासह सोमप्रशांत पाटील, संजय कदम, जगदीश बाबर, अभिजित चव्हाण, दिग्विजय पोवार हे सातजण कैदी वॉर्डच्या इमारतीच्या गच्चीवर पार्टी करीत असताना लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकून त्यांचा डाव उधळला होता. याप्रकरणी पोलिसांसह सातजणांना अटक केली. मंगळवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी कळंबा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. दरम्यान, सहायक फौजदार चौगुले व कॉन्स्टेबल मारुती पाटील यांनी गुन्हेगारांना दिलेल्या पाठबळामुळे पोलिस खात्याची नाचक्की झाली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन दोघांना खात्यातून बडतर्फ केल्याचे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले. निरीक्षक वरेकरसह तिघांची विभागीय चौकशी पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस दलाचे निरीक्षक आनंदा वरेकर हे मुख्यालयातील राखीव कर्मचाऱ्यांच्या ड्यूट्या लावतात. सहायक फौजदार बाबूराव चौगुले हा ‘सीपीआर’च्या कैदी वॉर्डमध्ये वारंवार ड्यूटीसाठी असतो. तसेच ड्यूटी असताना दि. १५ जूनच्या रात्री गैरहजर राहणाऱ्या कॉन्स्टेबल लखनराज बजरंग सावंत, नवनाथ विलास कदम यांची स्वतंत्रपणे विभागीय चौकशी सुरूआहे. गृह विभागाचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक संजय भांबुरे यांना अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तो प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये वरेकर यांच्यासह दोघे कॉन्स्टेबल दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही देशपांडे यांनी सांगितले. चेहरा लपविण्याचा प्रयत्नसहायक फौजदार बाबूराव चौगुले, कॉन्स्टेबल मारुती पाटील यांच्यासह अन्य आरोपींनी मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत घरातील जेवणावर ताव मारला. कारागृहात जेवण चांगले मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांना विनंती करून जेवण मागवून घेतले. त्यानंतर या सर्वांना पोलिस व्हॅनमधून कळंबा कारागृहाकडे घेऊन जाण्यासाठी कोठडीतून बाहेर काढताच त्यांचे फोटो घेण्यासाठी छायाचित्रकार पुढे सरसावले. यावेळी चौगुले याने डोक्यावर रुमाल घेऊन चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला. ‘एसटी’ गँगची चौकशी गजा मारणे टोळीतील कैदी सोमप्रशांत पाटील याला पळवून नेण्याचा कट एसटी गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसिलदार याने केल्याचा संशय पोलिसांचा आहे. त्या दृष्टीने पोलिस स्थानिक गुन्हेगारांची कसून चौकशी करीत असल्याचे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातून कळंबा मध्यवर्ती कारागृहाकडे पोलिस घेऊन जाताना सहायक फौजदार बाबूराव चौगुले याने वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांपासून चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला.
सहायक फौजदारासह कॉन्स्टेबल बडतर्फ
By admin | Published: June 22, 2016 12:53 AM