कुरुंदवाड : महात्मा फुले यांनी बहुजनांच्या घरात शिक्षणाची पेरलेली बिजे आता फळाला येत आहेत. दशरथ काळे यांच्यासारख्या सर्वसामान्य बहुजन कुटुंबातील कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना ‘मानद डॉक्टरेट’ मिळाली, हे त्याचेच द्योतक आहे. संविधान धोक्यात आणणारी विचारधारा आज वेगळ्या मार्गाने प्रवेश करत आहे. याचा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्षडॉ. श्रीपाल सबनीस यांनी करीत भाजप सरकारवर कडाडून टीका केली.डॉ. दशरथ काळे यांना आॅस्ट्रेलिया विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’ ही मानद पदवी मिळाल्याबद्दल इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृहात आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते.यावेळी खासदार राजू शेट्टी, उपनगराध्यक्ष सरिता आवळे, माजी आमदार राजीव आवळे, दादासो लाड, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, दादासो पाटील, किरण आलासे, रामचंद्र डांगे, पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, सावकार मादनाईक, प्रा. महेश थोरवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागत विद्याधर कुलकर्णी यानी, तर प्रास्ताविक आप्पा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत मुद्दापुरे, तर बाबासाहेब नदाफ यांनी आभार मानले.डॉ. काळे यांना अनोखी भेटकार्यक्रमासाठी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील प्रमुख पाहुणे होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे कार्यक्रमास वेळेत येणे शक्य नसल्याने डॉ. पाटील यांनी दशरथ काळे यांच्या चैतन्य शिक्षण समूहाला कार्यक्रमाआधीच भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची ‘मानद डॉक्टरेट’ही काळे यांना जाहीर करून अनोखी भेट दिली....तर निषेधाची पहिलीसभा माझीच असेलसाहित्यिक डॉ. सबनीस यांनी सुमारे एक तासाच्या व्याख्यानात भाजप सरकारवर कडाडून टीका केली तर दुसरीकडे खासदार शेट्टी यांची शेतकऱ्यांसाठी असलेली तळमळ व प्रामाणिक प्रयत्न यांचा गौरव करत असताना त्यांना शेट्टीसाहेब तुम्ही आमदार, खासदार व्हा. मात्र, मंत्री बनू नका. मंत्री झाल्याने तुमच्याच सहकाºयाची काय अवस्था झाली आहे, अशा कानपिचक्या देत जेव्हा मंत्री व्हाल तेव्हा तुमच्या निषेधाची सर्वांत पहिली सभा माझी असेल, असा इशारा देताच सभागृहाबरोबर खा. शेट्टी यांनीही त्यांच्या वक्तव्याला टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
वेगळ्या विचारधारेने संविधान धोक्यात: श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:07 AM