कोल्हापूर : जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या पुढाकाराने २ आक्टोबर ते १0 डिसेंबर २0१८ या कालावधीमध्ये दांडी ते दिल्ली अशी राष्ट्रव्यापी संविधान सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. २२ आॅक्टोबर रोजी ही यात्रा कोल्हापुरात येणार असून, या यात्रेचे स्वागत करण्याचा निर्णय विविध पक्ष आणि संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिले आहेत, त्यांना बाधा पोहोचवण्याच्या अनेक घटना सध्या देशात घडत आहेत. या विरोधात जनजागृती करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा दुसरा टप्पा २0 आक्टोबर रोजी सुरू होणार असून, मुंबई, पुणे, सातारा, इस्लामपूरमार्गे २२ आक्टोबर रोजी सकाळी १0 वाजता ही यात्रा कोल्हापुरात येणार आहे.
यावेळी कोल्हापूरच्या पद्धतीने या यात्रेचे स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने संघटना आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या कोल्हापूर शाखेचे संघटक दशरथ पारेकर आणि प्राचार्य टी. एस. पाटील यांनी केले आहे.दशरथ पारेकर आणि ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी स्वागत समितीचे निमंत्रकपद स्वीकारावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या पूर्वतयारीच्या बैठकीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी बी. एल. बरगे, संभाजी जगदाळे, विजय लोंढे, प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण, डॉ. भारतभूषण माळी, अशोक चौगुले, कृष्णात स्वाती, अरुण पाटील, सतीश पाटील यांच्यासह अंधश्रद्धा निमूर्लन समिती, विवेक वाहिनी, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.