लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातल्याने इमारत बांधकाम कामगार मंडळाच्यावतीने राज्यातील नऊ लाख मजुरांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी दोन वेळचे जेवण पोहोच करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. दोन-तीन जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू असला तरी कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोज काम केल्याशिवाय बांधकाम मजुरांना पर्याय नाही. अशांची निर्बंधामुळे अडचण झाली आहे. त्यांच्यासाठी दुपार व रात्रीचे अशा दोनवेळचे जेवण कामाच्या ठिकाणी पोहोच केले जाणार आहे. दोन-तीन जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हे सुरू आहे, राज्यात सर्वच जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना जेवण दिले जाणार आहे. साधारणत: पन्नास रुपयांचे जेवण प्रत्येक मजुराला दिले जाणार. राज्यातील नोंदणीकृत नऊ लाख मजुरांना याचा लाभ होणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
यांना होणार लाभ -
दगड कापणे, फोडणे.
लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलीश करणे
रंग, वॉर्निश लावणे, सुतारकाम.
गटार व नळ जोडणीची कामे
वायरिंग, वितरण, तावदान बसविणे, विद्युत काम
अग्निशामक यंत्रणा बसविणे व तिची दुरूस्ती करणे.
वातानुकुलित यंत्रणा बसविणे
काच कापणे, काचरोगण लावणे, काचेची तावदाने
वीटभट्टी, सिमेंट क्रॉंकीटच्या साचेबद्ध वस्तू