- दत्ता लोकरे
सरवडे : गेल्या सतरा वर्षात के. पी. पाटील यांनी अध्यक्षपदाची व ४० वर्षे संचालक म्हणून धूरा सांभाळून अनेक अडचणींना सामोरे जात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांनी व संचालक मंडळाने केलेले रचनात्मक कार्य कौतूकास्पद आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली बिद्री साखर कारखाना यापुढेही प्रचंड प्रगती साधेल, असा विश्वास माजी राज्यपाल डाॅ. डी. वाय. पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला.
बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ५९ व्या गळीत हंगामाचा त्यांच्या हस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते. तत्पुर्वी ऊस तोडणीचा शुभारंभ संचालक अशोक कांबळे यांच्या हस्ते तर काटा पुजन संचालक एकनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गव्हाणीचे विधीवत पुजन संचालक राजेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी निर्मलादेवी पाटील या उभयतांच्या हस्ते झाले.
के. पी. पाटील म्हणाले, बिद्री कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम पुर्ण झाले आहे. येत्या तीन - चार दिवसात गाळपास प्रारंभ केला जाईल. यावर्षी ऊसाची उपलब्धता मुबलक आहे. त्यानुसार तोडणी नियोजन केले आहे. बीड भागातील पावणेदोनशे टोळ्या कारखान्यावर दाखल झाल्या आहेत. स्थानिक व बोहेरील टोळ्यांच्या माध्यमातून तोडणी यंत्रणा सक्षम केली जाईल. त्यामुळे तोडणी व वाहतुकीची अडचण निर्माण होणार नाही. बिद्रीच्या व्यवस्थापनावर तमाम सभासदांचा प्रचंड विश्वास आहे. कारखान्याकडे २७ कोटीच्या ठेवी स्वेच्छेने ठेवून कारखान्यावरील विश्वास दृढ केला आहे.
या समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक सर्वश्री ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, गणपती फराकटे, प्रविणसिंह पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदुम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रविण भोसले, मधुकर देसाई, के.ना.पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदिप पाटील, जगदीश पाटील, संचालिका नीताराणी सुनिलराज सुर्यवंशी, अर्चना विकास पाटील, कामगार संचालक भिमराव किल्लेदार व शिवाजी केसरकर, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई यांच्यासह आजी – माजी संचालक, तोडणी – वाहतुक कंत्राटदार, ट्रक, ट्रँक्टर चालक वाहक, तोडणी – वाहतुक कामगार, कारखानांतर्गत विविध कामांचे ठेकेदार, कामगार, सभासद चार तालूक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी आभार मानले.पालकमंत्री सतेज पाटील महाराष्ट्राचे नेतृत्व करतील : के.पी.पाटीलपालकमंत्री सतेज पाटील उठावदार व प्रभावशाली काम शासनाच्या वतीने करत आहेत. त्यामुळे निश्चितच ते राज्याचे नेतृत्व करतील आणि ते पहाणे आम्हाला आनंददायी वाटेल असे के.पी.पाटील यांनी म्हणताच उपस्थितीतात अनेकांच्या भुवया उंचावल्या.
कामगारांना वेतनवाढ पुढील महिन्यात : कामगारांच्या उत्साहसाखर कारखान्याच्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढीचा निर्णय शासनाने घेतला आहे. साखर कारखानदारीत अनेक अडचणी असल्या तरी कामगारांच्या हितासाठी बिद्री कायमच अग्रेसर असून बिद्री साखर कारखान्याच्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय व गतवर्षीचा बोनसबाबत चर्चा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. वेतनवाढीची अंमलबजावणी पुढील पगारापासून केली जाईल तर वेतनवाढीच्या फरकाची रक्कम तीन टप्प्यात दिली जाईल असे आश्वासन गळीत हंगाम समारंभात अध्यक्ष पाटील यांनी दिले. वेतनवाढ अंमलबजावणीची अध्यक्ष पाटील यांनी घोषणा केल्याने बिद्रीच्या कामगारांमध्ये उत्साह पसरला आहे.