कोल्हापूर : येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाचा भंग करणाऱ्या आरोपी सुनील शामराव ताटे (रा. संकपाळनगर, कसबा बावडा) यास दोन प्रकरणांत दोन वर्षे साधी कैद, १० हजार रुपये दंड आणि फिर्यादीस ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा झाली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा सविता भोसले यांच्यासह सदस्य मनीषा कुलकर्णी आणि रूपाली घाटगे यांनी गुरुवारी (दि. ३०) येथे दिले.
फिर्यादी पुष्पांजली अमोल पाटील (रा. प्लॉट नं. १०१, मल्हारी हेरिटेज, दत्तमंदिरजवळ, महाडिक वसाहत ) आणि फिर्यादी उषा किशोर शिनगारे (रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) यांनी ग्राहक मंचासमोर २४ नोव्हेंबर २०१५ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता.
यामध्ये तक्रारदार पाटील यांनी करवीर तालुक्यातील मौजे नेर्ली येथील गट क्रमांक ११४ ते १२० या मिळकतीमध्ये बांधण्यात आलेल्या होम लिंक विश्वमधील बंगलो युनिट क्र. २७ व २८ क्षेत्र प्रत्येकी ६०० चौ.फू. या मिळकतीचे १६ जून २०१३ रोजीच्या संचकारपत्राप्रमाणे पाटील यांनी उर्वरित रक्कम सात लाख रुपये ताटे यांना अदा करावेत, तसेच तक्रारदार शिणगारे यांनी करवीर तालुक्यातील मौजे नेर्ली येथील गट क्रमांक ११४ ते १२० या मिळकतीमध्ये बांधण्यात आलेल्या होम लिंक विश्वमधील बंगलो युनिट क्र. २१ क्षेत्र प्रत्येकी ६०० चौ.फू. या मिळकतीचे ११ एप्रिल २०१३ रोजीच्या संचकारपत्राप्रमाणे शिणगारे यांनी उर्वरित रक्कम ३ लाख ५० हजार ताटे यांना अदा करावेत. त्यानंतर ताटे यांनी या मिळकतीचे बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्र व भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून या मिळकतीचा ताबा व नोंद खरेदीपत्रक पाटील व शिणगारे यांना पूर्ण करून द्यावे.
ताटे यांनी दोन्ही तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी प्रत्येकी पाच हजार रुपये व तक्रारीचा खर्च प्रत्येकी तीन हजार रुपये अदा करावेत, असे आदेश मंचने दिले होते. या आदेशाची महिन्यात न केल्याने तक्रारदारांनी १ जानेवारी २०१६ रोजी मंचाकडे फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार सविता भोसले यांनी वरील आदेश दिले.