लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गोडेतेलाच्या दरातील वाढ काही थांबेना. या आठवड्यात सरकी, शेंगतेल व सूर्यफूल तेलाच्या दरात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलबियांच्या मागणीत वाढ झाल्याचा परिणाम तेलांच्या दरावर झाला आहे. मे महिन्यातही तेजी कायम राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
जीवनाश्यक वस्तूंच्या दरात गेल्या वर्षभरात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्ये गोडेतेलाचाही समावेश आहे. मात्र इतर वस्तूंपेक्षा तेलाच्या दरात झालेली वाढ तुलनेने अधिक आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये गोडेतेलाचे दर व आताच्या दरात किलोला पन्नास रुपयांची वाढ दिसते. दिवाळीमध्ये सरकी तेल ११० , शेंगतेल १४५, तर सूर्यफूल तेल १४० रुपये किलो होते. मात्र त्यात वाढ होऊन आता किरकोळ बाजारात सरकी तेल १६४, शेंगतेल १९०, तर सूर्यफूल तेल १८५ रुपये किलो झाले आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेतही तेलाच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. किलोमागे दहा रुपयांची वाढ दिसत आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने तेलबियांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलबियांची मागणी वाढल्याचा परिणाम सध्या तेलाच्या दरावर दिसत आहे.
तेल भडकण्यामागील प्रमुख कारणे -
खरीप हंगामात तेलबियांच्या उत्पादनातील घट
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेंगदाण्यासह इतर बियांची वाढलेली मागणी
पामतेलाची मागणी कमी झाल्याचा परिणाम
भारतात मार्च महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेली तेलाची आयात
तेल आयात टनात
पामतेल - ५ लाख २६ हजार ४६३
वनस्पती - ९ लाख ८० हजार २४३
सूर्यफूल : १ लाख ४६ हजार ९७०
सोयाबीन : २ लाख ८५ हजार २००
कोट
भारतात तेलबियांच्या कमतरतेमुळे खाद्यतेलांचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज आहे. त्यातच सूर्यफूल तेलाची आयात वाढल्याने रिफाईन करणारे व्यापारी पामतेलाकडे वळले आहेत. साधारणत: मेपर्यंत तेलाचे दर तेजीत राहतील.
- केतन तवटे (लक्ष्मी ऑईल मिल, कोल्हापूर)