लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतून कोविड रुग्णांवर उपचार होतात. त्यासाठी संबंधितांनी आधारकार्ड व रेशनकार्ड घेऊन आरोग्यमित्राशी संपर्क करावा, असे आवाहन योजना समन्वयकांनी पत्रकातून केले आहे. कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील २३ रुग्णालयात या योजनेतून कोविड रुग्णांवर उपचार केला जातात.
कोल्हापूर जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ५३ रुग्णालये आहेत. या योजनेंतर्गत कोविड अथवा नॉन कोविड अशा ९९६ आजारांवर उपचार केले जातात. आतापर्यंत ३५६६ जणांना ७ कोटी रुपयाचा लाभ झाला आहे. एकूण रुग्ण संख्येच्या या योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी दिसते. ही वास्तव असले तरी एकूण बाधितपैकी ५० टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेतात. त्यानंतर काही जणांकडून कोविड सेंटरमध्ये उपचार घेतले जातात. महात्मा फुले योजनेत सहभागी नसलेल्या रुग्णालयात उपचार झाले आहेत, त्याचबरोबर अनेकांनी विमा अंतर्गत उपचार घेतल्याने ते या योजनेच्या बाहेरच राहिले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्यांची संख्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत कमी दिसत आहे.
या योजनेंतर्गत कोविड रुग्णांवर उपचार होण्यासाठी संबंधितांनी आरोग्य मित्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महात्मा फुले योजना जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांनी केले आहे.