लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून सत्तारूढ गटाने ठरावधारकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. विरोधी गोकुळ बचाव कृती समितीनेही आज, गुरुवारपासून करवीर तालुक्यातून संपर्क अभियान सुरू होत आहे.
‘गोकुळ’च्या सत्तेसाठी गेली सहा वर्षे सत्तारूढ व विरोधकांमध्ये शहकाटशहचे राजकारण सुरू आहे. मल्टिस्टेट, दूध दरवाढ आदी मुद्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी घेरले आहे. त्यामुळे गेली वर्षभर ठराव दाखल करण्यापासून विरोधी व सत्ताधाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत. सत्तारूढ संचालकांनी आपले तालुके सोडून इतर ठिकाणी संपर्क माेहीम राबवली आहे. ठरावधारकांच्या गाठीभेटी घेऊन गेल्या पाच वर्षांत दूध उत्पादकांसाठी काय योजना राबवल्या, हे पटवून सांगत आहेत. पाच-सहा संचालक मिळून एकत्रित प्रचार यंत्रणा राबवली आहे. तर काही संचालक एकटे एकटे फिरत आहेत.
विरोधी गटही आता सक्रिय होणार असून, आजपासून करवीर तालुक्यातून संपर्क अभियानास सुरुवात होते. गोकुळ बचाव कृती समितीच्या झेंड्याखाली सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र येणार आहेत. संस्थांना भेटी देऊन गेल्या पाच वर्षांत मल्टिस्टेटसह इतर बाबींवर सत्ताधाऱ्यांना कसे रोखून धरले, याचा पाढा वाचणार आहेत.
उमेदवार म्हणून नव्हे....
बचाव कृती समितीमध्ये गेली पाच वर्षे अनेकजण सक्रिय आहेत. मात्र आता प्रचार करताना उमेदवार म्हणून नव्हे, तर फिरायचे नाही, अशा स्पष्ट सूचना नेत्यांनी दिल्या आहेत.