कोल्हापूर :कोल्हापूर शहर परिसरात सध्या २३ ठिकाणी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. रुग्णांची संख्या वाढत जाईल तशी कंटेन्मेंट झोनची संख्या वाढत गेली असून, त्यामुळे शहराच्या विविध भागांत लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आल्याचे पहायला मिळते. दरम्यान, गंजीमाळ परिसरसुद्धा चारी बाजूने सील करण्यात आला असून तेथे पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू झाला.
गेल्या महिन्यापर्यंत कोल्हापूर शहर सुरक्षित असल्याचा दावा केला जात होता. संसर्ग वाढू नये, समूह संसर्ग वाढू नये म्हणून महापालिका प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त केली. परंतु, नागरिकांनीच याची फारशी गांभीर्याने दखल घेतली नसल्याने कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले. गंजीमाळ, वारे वसाहत या परिरसरात तर समूह संसर्ग झाल्यासारखी परिस्थिती आहे.
गेल्या चार, पाच दिवसांत वारे वसाहतीत ११, तर गंजीमाळ परिसरात २५ रुग्ण आढळल्यामुळे तेथील नागरीक भीतीने गारठून गेले आहेतच शिवाय महापालिका यंत्रणा देखील गडबडून गेली आहे. समूह संसर्ग वाढू नये म्हणून या भागात विशेष मोहीम राबवून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जवळच्या व्यक्तींना तपासणीकरिता रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. सुमारे दोनशेहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल कसे येतात याकडे आता लक्ष लागले आहे.
गंजीमाळ परिसरात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. गुरुवारी संपूर्ण गंजीमाळ सील झाला. या ठिकाणाहून कोणाला बाहेर व आत सोडले जात नाही. सर्व नागरिकांना आपापल्या घरात बसण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत जाईल तशी कंटेन्मेंट झोनची संख्या आता २३ वर गेली आहे. यापूर्वीचे अनेक कंटेन्मेंट झोन खुले करण्यात आले आहेत.कामावर सुट्टी देण्याचे आवाहनवारे वसाहत येथील अनेक महिला शहरातील विविध भागात धुणीभांड्याची तसेच पुरुष मजुरीची कामे करतात. सध्या त्यांचे भाग सील असल्यामुळे त्यांना किमान दहा दिवस सुट्टी द्यावी, अशी सूचना नगरसेवक किरण नकाते यांनी केल्यानंतर महापालिकेच्या वाहनावरून तसे आवाहन संभाजीनगर ते जयप्रभा स्टुडिओ परिसरात करण्यात आले.आरोग्य पथक तैनातगंजीमाळमध्ये बहुतांशी नागरिक सार्वजनिक शौचालयांचा वापर करत आहेत. समूह संसर्ग टाळण्यासाठी ही शौचालये दिवसातून दोन वेळा स्वच्छ करून औषध फवारणी केली जात आहे. शिवाय येथे वैद्यकीय पथक नेमण्यात आले असून ताप, खोकला कोणाला असेल तर तत्काळ तपासणी केली जात आहे.शहरातील रुग्णसंख्येत विसंगतीशहरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १५२ वर जाऊन पोहोचली असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे, तर सीपीआर रुग्णालयाच्यावतीने दिलेली रुग्णांची संख्या १८९ इतकी आहे. आकडेवारीत विसंगती असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या पाच आहे.