कोल्हापूर : सरकारी सेवेत सामावून घेऊन चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोतवालांचे गेल्या २३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. अद्यापही शासनाने या आंदोलनाकडे लक्ष दिलेले नाही. त्याच्या निषेधार्थ ३० हून अधिक कोतवालांनी आंदोलनस्थळी सामुदायिक मुंडण करुन निषेध केला. लवकर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.गेल्या २३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमेर कोतवालांचे धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कोतवालांनी शुक्रवारी आंदोलनस्थळी सरकारविरोधात घोषणा देत सामुदायिक मुंडण केले.
यामध्ये राधानगरी तालुक्यातील तानाजी पाटील कुमार कांबळे, गणेश हाक्के, बंडोपंत बरगे, पन्हाळा तालुक्यातील लहू पाडेकर, प्रकाश कांबळे, अतुल जगताप, शाहुवाडी तालुक्यातील शामराव तोडकर, महादेव बंडगर, गडहिंग्लज तालुक्यातील लक्ष्मण कांबळे, दत्तात्रय कांबळे, विजय कांबळे, विजय देसाई, कागल तालुक्यातील सुनिल पाटील आदींसह ३०हून अधिक जणांनी मुंडण केले.
कोतवाल संघटनेचे जिल्हा समन्वयक श्रीपती तोरस्कर म्हणाले, गेल्या चाळीस वर्षात राज्यकर्त्यांनी केवळ कोतवालांची बोळवणच केली आहे. आश्वासनांच्या खैरातीशिवाय दुसरे काहीच झालेले नाही.
गेल्या २३ दिवसांपासून आंदोलन सुरु असूनही सरकारने दखल घेतलेली नाही, तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदारांनीही भेट दिली परंतु त्यामुळे आमच्या पदरात काहीच पडलेले नाही. सरकारने जर लवकर दखल घेतली नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.