कोल्हापूर : निराधार आजी-आजोबांचा एक आधार बनलेल्या संभाजीनगरातील माऊली केअर सेंटरला कोरोना संसर्गामुळे अनंत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा अडचणीत बुधवारी एका उद्योजकासह सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. हे आधार केंद्र अडचणीत असल्याबाबत
‘लोकमत’मध्ये मंगळवारी (दि.२१) वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यात समाजाच्या दातृत्वाला साद घातली होती. त्यास समाजातून प्रतिसाद मिळत आहे.
या वृद्धाश्रमात आजमितीला ४८ स्त्री-पुरुष आजी-आजोबा वास्तव्यास आहेत. त्यापैकी २१ जण निराधार आहेत, तर अन्य २७ जणांच्या येणाऱ्या तुटपुंज्या शुल्कातून व अन्य सेवा देऊन संस्थेचा खर्च भागवावा लागतो. याबाबत ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच दात्यांनी एक टन अन्नधान्याची मदत केली. याशिवाय बुधवारी (दि.२८) उद्योजक व्ही.के. पाटील यांनी २५ हजारांचा धनादेश दिला, तर दाभोळकर ट्रस्टनेही आर्थिक मदत दिली.
अडचणी काही कमी होईनात
संस्थेत आश्रयासाठी असलेल्या पाली (रत्नागिरी) येथील महिलेच्या हाताला गँगरीन झाले आहे. शस्त्रक्रिया करून कोपरापासून हात काढावा लागणार आहे. या परिस्थितीत संस्थेकडे पैसे नाहीत. त्यामुळे हा खर्च आणि औषधोपचार कसे करायचे, असा प्रश्न पडला आहे.
या प्रवृत्तीला काय म्हणायचे ?
कर्नाटकातील एका ज्येष्ठाने पहिल्या पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे दोन वर्षांपूर्वी संस्थेत दाखल केले. दरमहा ते दोन हजार रुपये संस्थेला पाठवीत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी ही मदत बंद केली आहे. अनेक वेळा फोन केल्यानंतर ते कोरोनामुळे लाॅकडाऊन आहे. त्यामुळे येऊ शकत नाही. दोन दिवसांपूर्वी फोन केल्यानंतर त्यांनी ती मेल्यानंतरही मला संर्पक करू नका, तुम्हाला काय करायचे ते करा; पण माझ्याकडे पाठवायचे नाही, असे म्हणत फोन ठेवला.