कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात येऊ घातलेल्या नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सर्व यंत्रणा कमालीच्या कामाला लागल्या आहेत. मंदिरातील स्वच्छतेला बुधवारपासून प्रारंभ झाला. मुंबईतील संजय मेंटेनन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या कामाला सुरुवात केली. दुसरीकडे देवस्थान समितीच्यावतीने पूर्वदरवाजा येथील मुख्य दर्शन रांगांच्या ठिकाणी मांडव उभारणी करण्यात येत आहे. नवरात्रौत्सवाला आता अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, पोलिस प्रशासन व श्रीपूजकांनी आपआपल्या पातळीवर उत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संजय मेंटेनन्सच्या १२ कर्मचाऱ्यांनी दीपमाळांपासून मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात केली. हेरिटेज समितीने या कर्मचाऱ्यांना मंदिर स्वच्छ करताना पाण्याच्या फवाऱ्याचा दाब कमी ठेवण्याची सूचना केली आहे. मंदिराच्या आतील परिसरात मात्र हा फवारा वापरण्यात येणार नाही. येथे फक्त पाईपलाईनने पाणी मारून स्वच्छता करण्यात येणार आहे. स्वच्छतेचे हे काम किमान आठ दिवस चालेल. मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी सुरू झाली आहे. हेरिटेज समितीच्या सल्ल्यानुसार मंदिराच्या शिखरांचा रंग बदलण्यात आला आहे. नेहमीच्या तुलनेत पिवळ््या रंगाचा गडदपणा कमी करण्यात आला आहे. मात्र, दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे या कामात अडथळा आला. अंबाबाईच्या गाभारा दर्शनाची रांग पूर्व दरवाजातून जाते त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मांडव उभारण्यात येत आहे. दरम्यान, करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीस्तव करवीर प्रांत कार्यालयासमोर तात्पुरत्या स्वरुपाची आठ स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्थानिक नागरिक व काही शिक्षकांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ही स्वच्छतागृहे ‘पे अॅन्ड युज’ तत्त्वावर चालविण्यास दिली जाणार आहेत. करवीर प्रांत कार्यालयासमोर गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्यामुळे गरजेनुसार त्याचठिकाणी आणखी काही फायबरची स्वच्छतागृहे उभ्या केल्या आहेत; परंतु त्याची दैनंदिन स्वच्छता होत नसल्याने तसेच सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. दरम्यान, महानगरपालिकेने नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुन्या फायबरची स्वच्छतागृहे काढून तेथे नवीन स्वच्छतागृहे उभी करण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले; पण स्थानिक नागरिक तसेच इंदुमती गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षकांनी त्याला हरकत घेत काम थांबविले होते. त्यामुळे बुधवारी स्थानिक नगरसेविका हसीना फरास, माजी नगरसेवक आदिल फरास यांनी मनपा अधिकारी व स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन अडचण समजावून घेतली. स्वच्छतागृहांची दैनंदिन स्वच्छता होत नाही, दुर्गंधी पसरते याचा विषय आधी संपवा, अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली. त्यावेळी मनपाचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दर्शन मंडपाचे काम होईपर्यंत ही स्वच्छतागृहे तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने ‘पे अॅन्ड यूज’ तत्त्वावर चालवायला देण्यात येतील, त्यामुळे दररोजच्या दररोज स्वच्छता होईल आणि दुर्गंधीचा विषय आपोआप संपेल, असे सांगितले. यावेळी उपशहर अभियंता एस. के. माने, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते. पुरुष व महिलांसाठी प्रत्येक चार याप्रमाणे आठ स्वच्छतागृहे उभारण्यात येतील. ‘अंबाबाई’ परिसरात सशस्त्र बंदोबस्त ठेवा : नांगरे-पाटील कोल्हापूर : येथील शारदीय नवरात्रौत्सवात ‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी परराज्यांतून लाखो भाविक येत असतात. देशात होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिरासह भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदाच्या नवरात्रौत्सवाचे शिस्तबद्ध नियोजन करून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिस प्रशासनास दिले. पोलिस मुख्यालयात बुधवारी क्राईम बैठक झाली. यावेळी अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यांतील कामकाजाचा आढावा नांगरे-पाटील यांनी घेतला. यावेळी अधिकाऱ्यांशी बोलतांना ते म्हणाले, पोलिस प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीमुळे गणेशोत्सव शांततेत पार पडला. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाला काही मंडळांनी विरोध केला. त्यांच्यावर खटले दाखल करून कठोर कारवाई होण्यासंबंधी पाठपुरावा करा. गणेशोत्सवाप्रमाणेच बकरी ईदही उत्साहात साजरी झाली. मंदिराची सुरक्षा व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. उत्सवकाळात सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करा. शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी परिसरात सर्व वाहनांना पार्किंगसाठी व प्रवेशास बंदी घालण्यात यावी. गुन्हेगारांच्या शिक्षेचे प्रमाण वाढले पाहिजे, त्यामुळे कोणाचे गुन्हे करण्याचे धाडस होणार नाही. पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदे, फाळकुटदादांची दादागिरी चालता कामा नये, संपूर्ण जिल्ह्यांत भयमुक्त वातावरण झाले पाहिजे.
नवरात्रौत्सवाच्या तयारीची धामधूम सुरू
By admin | Published: September 22, 2016 12:58 AM