कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य व कीटकनाशक विभागामार्फत शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणाकरिता डास-अळींचे सर्वेक्षण सुरू असून, गुरुवारी या मोहिमेत २८६० घरे तपासण्यात आली. या घरांमध्ये वापरासाठी साठविण्यात येणारे ४५९८ कंटेनर तपासले. यामध्ये दूषित ११ ठिकाणी डास-अळ्या आढळल्या. दूषित आढळलेल्या ठिकाणी अळीनाशक टाकण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने खासगी एजन्सीमार्फत २५ बिडिंग चेकर्स नेमण्यात आले आहेत. आरोग्य निरीक्षक, मुकादम, डासअळी सर्व्हेक्षण कर्मचारी यांचे सोबत या बिडिंग चेकर्सनी घोडकेवाडी, विश्वकर्मा बिल्डिंग, सफारी पार्क, आंगण अपार्टमेंट, अनंतपुरम, बापट कॅम्प, अथर्व ओंकार अपार्टमेंट, भोई गल्ली, मुक्त सैनिक बाग, गणेश कॉलनी, मदन पाटील गल्ली, इंद्रजित कॉलनी, भुईराज सोसायटी, देव गल्ली, प्रिन्स गल्ली, स्वामी गल्ली, जाधववाडी, इत्यादी ठिकाणी डास-अळीचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
डेंग्यू, चिकुनगुनियाची लक्षणे आढल्यास महानगरपालिका आरोग्य विभाग व शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.