कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राकडील उर्वरित चार अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. आता एकूण १३ पैकी सर्वच १३ अभ्यासक्रमांना ही मान्यता मिळाली आहे. त्यातील एम. ए. इंग्रजी, एम. ए. अर्थशास्त्र, एम. एस्सी. (गणित), एम. कॉम. (व्हॅल्यूएशन आॅफ रिअल इस्टेट) या पदव्युत्तर विषयांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, आदी जिल्ह्यांतील ७७ अभ्यासकेंद्रांमध्ये विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सैनिक, उद्योजक, शेतकरी, कामगार व बंदीजन, आदी शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना प्रवेश घेता येणार आहे. संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज उपलब्ध आहे, अशी माहिती दूरशिक्षण केंद्राचे उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे यांनी दिली. संपूर्ण आॅनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत अभ्यासकेंद्रावर जमा करण्याची मुदत नियमित शुल्कासह दि. १ फेब्रुवारीपर्यंत, विलंब शुल्कासह दि. ९ फेब्रुवारी, तर दि. १५ फेब्रुवारीपर्यंत अतिविलंब शुल्कासह आहे. दूरशिक्षण केंद्राच्या चार अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असल्याने जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत, अशांनी सदर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा, असे आवाहन दूरशिक्षण केंद्राचे संचालक प्रा. डॉ. एम. ए. अनुसे यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचेआॅनलाईन अर्ज भरण्यापूर्वी माहितीपुस्तिका पाहूनच विद्यार्थ्यांनी स्वत:चा युजर आयडी व पासवर्ड तयार करून रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. ज्या विषयांचे स्वयंअध्ययन साहित्य उपलब्ध आहेत, त्याची खात्री करून, तेच विषय निवडावेत. विद्यार्थ्यांच्या सोईकरिता विद्यार्थ्याने निवडलेले अभ्यासकेंद्र हेच शक्यतो परीक्षा केंद्र म्हणून दिले जाते. प्रथम वर्ष नव्याने आॅनलाईन अर्ज सादर करताना आॅनलाईन अथवा आॅफलाईन शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे बँकेची कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे.