कोल्हापूर : प्राध्यापकांच्या कामबंद आंदोलनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या. विविध ७७ अभ्यासक्रमांच्या सहाशे परीक्षा डिसेंबर अखेरपर्यंत चालणार आहेत.विद्यापीठातर्फे पहिल्या सत्रातील परीक्षा आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून घेण्यात येणार होत्या. मात्र, यापूर्वी विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू झाले. परीक्षा सुरू होण्याआधी एक आठवडा आधी हे आंदोलन मागे घेण्यात आले. पण, अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने विद्यार्थी, प्राध्यापक संघटनांनी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यापीठाकडे केली.
विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला. त्यानुसार नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रारंभ सोमवारपासून झाला. त्यामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. ए., बी. एड., एम. एस्सी, बीसीएस, बीसीए, बी. कॉम., अशा विविध ७७ अभ्यासक्रमांच्या सहाशे परीक्षांचा समावेश आहे.
सकाळी साडेनऊ ते साडेअकरा, साडेदहा ते साडेबारा आणि दुपारी बारा ते तीन, तर दुपारी दोन ते सायंकाळी पाच आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच अशी परीक्षांची वेळ आहे. परीक्षांमुळे विद्यापीठ आणि विविध महाविद्यालयांचा परिसर विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलला आहे. या सत्रात विद्यापीठातील विविध अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांमधील सुमारे ८० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
‘एसआरपीडी’चा ७४ अभ्यासक्रमांसाठी वापरया परीक्षांसाठी ‘एसआरपीडी’ (सिक्युअर्ड रिमोट पेपर डिस्ट्रीब्युशन) या प्रणालीच्या माध्यमातून ७४ अभ्यासक्रमांचे पेपर परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात आले. बी. ए., एम. एस. डब्ल्यू आणि बी. ए. बी. एड. अभ्यासक्रमांचे पेपर छपाई करून दिले आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, अभियांत्रिकी आणि वाणिज्य अभ्यासक्रमांची परीक्षा १८ दिवसांत, तर बी. ए. आणि बी. एस्सी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ४२ दिवसांमध्ये पूर्ण होतील. डिसेंबरअखेरपर्यंत पहिल्या सत्रातील परीक्षा सुरू राहतील.