कोल्हापूर : ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघाचा सराव सोमवारपासून सुरू झाला. यावर्षीचा महोत्सव नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात दि. ७ ते ११ डिसेंबर दरम्यान होणार आहे.या महोत्सवासाठी विद्यापीठाने मध्यवर्ती महोत्सवानंतर निवड चाचणी घेतली. त्यातून ३२ विद्यार्थी कलाकारांची निवड करून संघाची बांधणी केली आहे. लोकनृत्य, लोककला, लोकसंगीत वाद्यवृंद, एकांकिका, पथनाट्य, लघुनाटिका, मूकनाट्य, भारतीय समूहगीत, सुगम गायन, वादविवाद, वक्तृत्व (मराठी, इंग्रजी आणि हिंदी), प्रश्नमंजूषा, नकला, आदी विविध २५ प्रकारांमध्ये विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे.
विद्यापीठातील वि. स. खांडेकर सभागृहात या संघातील विद्यार्थी कलाकारांचा सराव सुरू झाला आहे. हा संघ दि. ६ डिसेंबरला नाशिकला रवाना होणार आहे, अशी माहिती विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी दिली.
परीक्षा दिल्यानंतर सरावविद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षा आणि अभ्यास सांभाळून विद्यार्थी कलाकार सरावासाठी वेळ देत आहेत. परीक्षा असल्याने यावर्षी काही दिवस आधीच सराव सुरू केला असल्याचे डॉ. गुरव यांनी सांगितले.