कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील ‘बॅचलर आॅफ टेक्नॉलॉजी’ (बी. टेक.) अभ्यासक्रमाच्या पदवी प्रमाणपत्रातील चुकांबाबत २५ विद्यार्थ्यांनी मंगळवारी परीक्षा विभागाकडे तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेऊन त्या बदलून देण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.शिवाजी विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्याशाखेतील बी. टेक. अभ्यासक्रमाच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये एकाच प्रमाणपत्रावर दोन विद्यार्थ्यांची नावे, दोन वर्षांचा उल्लेख, पदवीधराच्या नावावरच डिझायनिंगची छपाई अशा चुका असल्याचे दिसून आले. सोमवारी (दि. १९) विद्यार्थ्यांनी याबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी पदवी वितरण स्टॉलवरील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते.
मंगळवारी परीक्षा विभागाकडे बी. टेक.च्या पदवी प्रमाणपत्रांमधील चुकांबाबत २५ विद्यार्थ्यांनी तक्रारी नोंदविल्या. त्यांच्या पदवी प्रमाणपत्रांमधील चुका दुरुस्त करून देण्याचे काम सुुरू करण्यात आले. यासह ज्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये काही चुका असतील, त्यांनी तत्काळ विद्यापीठातील परीक्षा विभागाकडे तक्रार नोंदवावी, त्यांच्या प्रमाणपत्रावरील चुका सुधारून त्यांना नवे पदवी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था परीक्षा विभागातर्फे करण्यात आली आहे.