चंद्रकांत कित्तुरे-- कोल्हापूर --मोकाट कुत्र्यांना मारण्यास कायद्याने बंदी असल्याने त्यांचे निर्बिजीकरण करण्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्याय नाही. पिसाळलेल्या आणि मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी त्रस्त सांगली-मिरज-कुपवाड आणि कोल्हापूर महापालिकांनी तशा हालचाली चालू केल्या आहेत. सांगलीत तर त्याची अंमलबजावणीही चालू झाली आहे. कोल्हापुरातही येत्या १५ दिवसांत ही मोहीम चालू होणार आहे. या मोहिमा नियमित चालू राहिल्या, तरच मोकाट कुत्र्यांची संख्या कमी होऊ शकेल. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने कुत्र्यांच्या निर्बिजी करणाचा ठेका न देता स्वत:च हे केंद्र चालू करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी आयुक्त रवीेंद्र खेबुडकर यांनी महापालिका हद्दीतील दररोज शंभर कुत्री पकडण्यात येतील, अशी घोषणा केली. कुत्री पकडण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून ती आठ वरून १५ केली. कुत्र्यांना पकडण्यासाठी जादा जाळ्याही दिल्या आणि कुत्री पकडण्याची मोहीम चालू झाली. गुरुवारी या पथकांनी ६५ मोकाट कुत्र्यांना पकडले आहे. या कुत्र्यांवर प्रतापसिंह उद्यानातील केंद्रात निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. याचबरोबर चिकन आणि मटण दुकानदारांनाही त्यांनी ओला कचरा रस्त्याकडेला टाकल्यास फौजदारी दाखल करण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापूर महापालिकेनेही येत्या १५ दिवसांत कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी स्वत:चे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी (पशुवैद्यकीय) डॉ. विजय पाटील यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले. या मोहिमेसाठी महापालिकेने दहा लाखांची तरतूद केली आहे. कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना तीन दिवस निरीक्षणाखाली ठेवावे लागते. यासाठी महापालिकेच्या मोकळ्या इमारतींमधील तीन इमारती सुचविल्या आहेत. त्यातील एक निश्चित करून एका अशासकीय संघटनेच्या (एनजीओ) मदतीने तेथे हे केंद्र चालू केले जाणार आहे. ते नियमितपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.महापालिकांनी उपाययोजना सुरू केली असली तरी कुत्र्यांची मोठी संख्या पाहता ती पुरेशी आहे का? की मोकाट कुत्र्यांना मारण्याची परवानगी देण्यासाठी कायद्यात बदल करण्याची गरज आहे. नीलगायींसाठी केंद्र सरकारने जी भूमिका घेतली आहे, तशी भूमिका मोकाट कुत्र्यांच्या बाबतीतही सरकार घेईल का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. (समाप्त)काही तथ्येसांगलीतील शासकीय रुग्णालयात दरवर्षी कुत्रा चावलेले सुमारे सहा हजार रुग्ण दाखल होतात.कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील श्वानदंश झालेल्या रुग्णांची संख्या घटलेली दिसते. २०१३ मध्ये ४८३९ आणि आठ मृत्यू, २०१४ मध्ये ३९५६ आणि चार मृत्यू, तर २०१५मध्ये २७४७ आणि चार मृत्यू अशी आहे.इचलकरंजीत सुमारे तीन हजार मोकाट कुत्री आहेत. तेथे दरवर्षी कुत्रा चावलेले सुमारे १६२५ रुग्ण उपचार घेतात. तर खासगी रुग्णालयात सुमारे एक हजार रुग्ण उपचार घेतात, अशी माहिती इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. गेल्या १६ वर्षांपासून इचलकरंजीत मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबविण्यात आलेली नाही, असेही सांगण्यात आले.हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात एक एप्रिल २०१५ पासून मे २०१६ अखेर ८३४ श्वानदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत..कागल तालुक्यात कुत्रा चावलेले दररोज आठ ते दहा रुग्ण दाखल होतात, अशी माहिती तेथील सूत्रांनी दिली. शाहूवाडी तालुक्यात एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत ५३२ जणांना श्वानदंश झाला आहे. तर एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत ८५९ जणांना श्वानदंश झाला आहे. वाचकांना आवाहन !मोकाट कुत्र्यांचा हा प्रश्न खूपच गंभीर आहे. अनेकजण त्यांचे लक्ष्य बनले असतील. काय आहेत तुमचे अनुभव? काय करता येईल या कुत्र्यांना आवरण्यासाठी? लिहा आणि पाठवा आमच्याकडे. निवडक पत्रांना प्रसिध्दी देऊ.आमचा पत्ता : लोकमत ,लोकमत भवन प्लॉट नं. डी-३७,४८ व ४८/१ शिरोली एमआयडीसी, पुणे-बंगलोर रोड, कोल्हापूर, ४१६१२२.इमेल- ‘ङ्म’ीि२‘@ॅें्र’.ूङ्मे
मोकाट कुत्र्यांचे सांगलीत निर्बिजीकरण सुरू
By admin | Published: June 24, 2016 1:37 AM