आजरा : आजरा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही संततधार पाऊस सुरूच आहे. काल सकाळपासून पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. तालुक्यात काल सरासरी १२७ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. पावसाने पेरणोली मार्गे आजरा-गारगोटी रोडवरील कोरीवडेपैकी नार्वेकर वस्तीजवळील ओढ्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मलिगेर येथील कृष्णा बुगडे यांच्या गोठ्याची भिंत पडल्याने १० हजारांचे नुकसान झाले आहे. चित्री धरणासह सर्व धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हिरण्यकेशी नदीपात्राबाहेरून वाहत आहे.
आजरा तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतीची मशागतीची कामे पूर्ण झाली. त्यापाठोपाठ पेरणीची कामेही आटोपली आहेत. तालुक्यात भात, सोयाबीन, भुईमूग, पेरणी व टोकणणी कामे पूर्ण झाली असून सध्या सर्वच पिकांना बाळ कोळपणीला सुरुवात झाली आहे.
मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाने शेतात पाणी तुंबले आहे. चांगली उगवण झालेली पिके पाण्यात उभारली आहेत. यापुढेही पाऊस सुरूच राहिल्यास पिकांना धोका आहे.
पावसाने हिरण्यकेशी व चित्रा नदी पात्राबाहेरून वाहत आहेत. गावा-गावांतील ओढे-नाले यांना पूर आला आहे. हिरण्यकेशी नदीवरील रामतीर्थ धबधबा पूर्णक्षमतेने कोसळत आहे. पावसाने आजरा शहर चिखलमय झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात गटारींची कामे सुरू आहेत.
गटारीतील माती रस्त्यावर टाकल्यामुळे पावसाने सर्वत्र दलदल तयार झाली आहे. काही ठिकाणी बांधलेल्या गटारीतून पाणी तुंबल्यामुळे नागरिकांतून तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
-------------------------
*
गवसेत १७० तर आजऱ्यात १५७ मि. मी. पाऊस
आजरा तालुक्यात आज सकाळी आठपर्यंत सरासरी १२७ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यापैकी गवसे येथे १७०, आजरा १५७, मलिग्रे ११२ तर, उत्तूर येथे ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वत्र अतिवृष्टीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
--------------------------
* पावसाचा जोर कायम
तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतच आहे. गावागावांतील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतांमध्ये पाणी तुंबले आहे. पावसाचा जोर आणखीन वाढल्यास पिकांना धोका होण्याची शक्यता आहे. आज दिवसभरही पावसाचा जोर कायम आहे.
------------------------
* चित्री प्रकल्प ४० टक्के भरला
चित्री प्रकल्पाच्या परिसरात गेले दोन दिवसांपासून मुसळणार पाऊस सुरूच आहे. गेल्या २४ तासांत या ठिकाणी १४० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. चित्री प्रकल्पात आज सकाळी ८ वाजता ७७१ द. ल. घ. फू म्हणजे ४०.८६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
------------------------
* फोटो ओळी : आजरा-पेरणोली मार्गे गारगोटी रस्त्यावरील कोरीवडेपैकी नार्वेकर वस्तीजवळील ओढ्यावर आलेले पाणी.
क्रमांक : १६०६२०२१-गड-०२