कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज, बुधवार सकाळपासून पावसाची जोर कमी असला अधून मधून मोठ्या सरी बरसत आहेत. पंचगंगेची पाणी पातळी ३५ फूट ६ इंचापर्यंत पोहचल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूटावर तर धोका पातळी ४३ फूट आहे. सद्या इशारा पातळीसाठी केवळ ४ फुटाचा फरक आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरपरिस्थितीची शक्यता आहे. मात्र, प्रशासनही संतर्क असल्याने नागरिकांना वेळीच योग्य सूचना केल्या जात आहे.
धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणातून अद्याप मोठ्या प्रमाणात विसर्ग नसल्याने नद्यांचे पाणी संथगतीने वाढत आहे, तरीही जिल्ह्यातील ५५ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. गगनबावडा, शाहूवाडी व राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. काल, मंगळवार सकाळपासून तर जोर वाढत गेला. दुपारी थोडी उसंत घेतल्यानंतर पुन्हा एकसारखा पाऊस राहिला. पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यात पाऊस तुलनेत अधिक आहे. पाऊस जोरदार असला तरी नद्यांची पाणी पातळी संथगतीने वाढत आहे. पंचगंगेची पातळी सोमवार ते मंगळवारपर्यंत केवळ फुटाने वाढली. पाण्याचा विसर्ग चांगला असल्याने पातळी झपाट्याने वाढत नाही. तरीही पंचगंगा इशारा पातळीकडे आगेकूच करू लागल्याने कोल्हापूरकर धास्तावले आहेत.राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १३५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीला अधिक फुग दिसते.
पडझडीत ३.२३ लाखांचे नुकसान
जिल्ह्यात मंगळवार सकाळपर्यंत संपलेल्या चोवीस तासात एक सार्वजनिक मालमत्ता व १३ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये ३ लाख ३३ हजारांचे नुकसान झाले आहे.
आज ऑरेंज अलर्टकोल्हापुरात आज, बुधवारी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा अंदाज आहे.