बेळगाव : बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिले असले तरी कन्नड संघटनांत अखंड आणि वेगळं राज्य या विषयावरून मतांतरे निर्माण झाली आहेत. दोन प्रवाहांतील फुटीचा प्रत्यय गुरुवारी आला.कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी वेगळं उत्तर कर्नाटक राज्य नको, राज्याचं विभाजन नको म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली तर वेदिकेच्या कार्यकर्त्यांसमोरच उत्तर कर्नाटक विकास वेदिकेच्यावतीने जिल्हाधिकारीद्वारा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. बेळगावला उपराजधानीचा दर्जा देऊन शासकीय कार्यालये सुवर्ण विधान सौधमध्ये पंधरा दिवसांत निर्णय घ्या अन्यथा उत्तर कर्नाटक वेगळ्या राज्याची मागणी करू, असा इशारा दिला. यावेळी दोन्ही संघटनांनी परस्परविरोधी घोषणाबाजी केली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उत्तर कर्नाटक वेगळं राज्य हवं म्हणून हुबळी येथील एका संघटनेने ‘उत्तर कर्नाटक बंद’ची घोषणा केली होती. बेळगावात त्याला एकही संघटनेने पाठिंबा दिला नाही. मात्र, बस किंवा इतर सुविधा सुरू होऊ देत यासाठी अखंड कर्नाटकसाठी कन्नड वेदिकेच्यावतीने बसस्थानकावर अनेक बसचालक प्रवासी आणि आॅटो चालकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उत्तर कर्नाटक विकास वेदिकेच्यावतीने आरटीआय कार्यकर्ते भीमापा गडाद, अडिवेश इटगी यांच्या नेतृत्वाखाली तर कन्नड वेदिकेच्यावतीने महादेव तलवार आणि गणेश रोकडे यांनी आंदोलन केले. उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या मुद्द्यावर सध्या बेळगावात वातावरण तापलं असून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तीन शासकीय कार्यालये बेळगावात स्थलांतर करू, अशी घोषणा करून बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्याच आश्वासन दिलंय ते आश्वासन कधी पूर्ण करतात उपराजधानीचा दर्जाला तांत्रिक अडचणी आहेत. त्यावर काय उपाय काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अखंड की वेगळं राज्य यावरून मतांतरे; कन्नड वेदिका व उत्तर कर्नाटक विकास वेदिकेची परस्परविरोधी घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:36 AM