कोल्हापूर : विक्रीपश्चात चांगली सेवा पुरविली नाही म्हणून राज्य शासनानेच काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकलेल्या सॅमसंग कंपनीचे झेरॉक्स मशीन पुरवठा करण्याच्या निविदेस जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने गुरुवारी तांत्रिक मंजुरी दिली. मुंबईच्या ‘लेजर टेलिसिस्टिम कंपनी’ने ही निविदा भरली आहे. तीन कोटी रुपयांची झेरॉक्स मशीन पुरविण्यात येणार आहेत. निविदेच्या व्यावसायिक कराराबाबत आज, शुक्रवारी निर्णय होणार आहे.समाजकल्याण विभागातर्फे स्वयंम् रोजगार योजनेअंतर्गत ही मशीन्स पुरवली जातात. त्यातून अपंग, मागासवर्गीय पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची मशिन्स पुरविली जाणार आहेत. एका झेरॉक्स मशिन्सची किंमत सरासरी ४० ते ६० हजार इतकी आहे. या विभागाने नोव्हेंबर महिन्यांत ई निविदा मागविल्या होत्या. त्यासाठी ६० हजार रुपये खर्च करून कागदपत्रे निविदेसोबत जमा करायची होती. एकूण सात निविदा आल्या होत्या. निविदा उघडण्याची प्रक्रिया यापूर्वी तीनवेळा रद्द झाली. सातपैकी तिघांच्या निविदा अपुऱ्या कागदपत्रांअभावी रद्द झाल्या. गुरुवारी लेझर टेलिसिस्टीम या कंपनीची निविदा तांत्रिकदृष्ट्या मंजूर करण्यात आली.ही कंपनी म्हणजे सॅमसंग कंपनीच्या झेरॉक्स मशिन्सची वितरक आहे. सॅमसंग इंडिया लिमिटेड या कंपनीचीच झेरॉक्स मशिन्स पुण्यात पुरविण्यात आली होती. त्यांनी ती पुरविताना तीन वर्षांची वॉरंटी दिली होती; परंतु एक वर्ष झाल्यानंतर त्यांनी वॉरंटी देण्यास नकार दिला म्हणून या कंपनीस काळ््या यादीत टाकले आहे. तीन कोटींची निविदा आहे व ज्या कंपनीची निविदा मंजूर केली आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न ३५ लाख रुपयांचे आहे. त्यांच्या शॉप अॅक्ट लायसन्सची मुदत डिसेंबरमध्ये संपली आहे. अशा त्रुटी असतानाही त्याच कंपनीची निविदा मंजूर का केली जात आहे, अशी तक्रार अन्य निविदाधारकांनी संबंधित विभागाकडे केली आहे.
‘काळ्या यादी’तील कंपनीस ठेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2016 12:36 AM