महेश आठल्ये
म्हासुर्ली : राई (ता. राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामावर ठेकेदार कंपनी खडक फोडण्यासाठी शक्तीशाली भुसुरुंगाचा वापर करत आहे. परिणामी चौके - मानबेट परिसरातील अनेक घरांना तडे गेले आहेत. येथील नागरिक भीतीने हवालदिल झाले तर पाण्याच्या बोरवेल व जीवंत झऱ्याचे पाणी आटल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला. याबाबत ग्रामस्थ, ग्रामपंचायतीने तोंडी - लेखी तक्रार करूनही ठेकेदार कंपनी व शासनाच्या जलसंपदा विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. धामणी मध्यम प्रकल्पांतर्गत चौके - मांडकरवाडी गावांच्या बाजूने जाणाऱ्या सांडव्याचे काम सुरू आहे. येथील खडक फोडण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून शक्तिशाली भूसुरूंगाचा वापर अमर्यादीत प्रमाणात सुरु आहे. भूसुरुगांच्या हादऱ्याने गावातील घरांना तडे गेले आहेत.
झर्यांतुन येणारे पिण्याचे पाण्याचे स्रोत हे बंद झाले आहेत. त्यामुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. भूसुरूंगातून उडणाऱ्या प्रचंड धुळीच्या लोटामुळे परिसरातील शेत पिकांवर धुळीचा थर बसत आहे. परिणामी धुळीने माखलेला चारा खाऊन जनावरे आजारी पडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
भूसुरुंगाच्या मोठ्या आवाजामुळे वयोवृद्ध ग्रामस्थांसह लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक वेळा सुचना केल्या आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून संबंधीत कंपनीने यावर उपाय योजना कराव्यात. - संभाजी कांबळे, सरपंच , ग्रामपंचायत मानबेट