कोल्हापूर : शहरामध्ये अमृत योजनेअंतर्गत पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामास कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही अशा शब्दांत ठणकावून सांगतानाच कन्सल्टंटने काम प्रगतिपथावर व समाधानकारक नसल्यामुळे जो १२ लाखांचा प्रतिदिन दंड प्रस्तावित केला आहे तो तत्काळ लावण्यात यावा, असे संबंधित अधिकाऱ्यांना स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी बजावले.
अमृत योजनेअंतर्गत सुरूअसलेल्या कामाबाबत सभापती देशमुख यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी देशमुख यांनी नगरसेवक, संबंधित अधिकारी, ठेकेदार व कन्सल्टंट यांच्या उपस्थितीत ठेकेदारास ठणकावले.अमृत योजनेअंतर्गत पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम समाधानकारक नसल्याबद्दल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. काम खूप संथ गतीने सुरूआहे, उर्वरित नऊ महिन्यांत ३१९ कि.मी. पाईपचे व १२ टाक्यांचे काम कसे पूर्ण करणार असा सवाल त्यांनी विचारला. दास आॅफशोअरचे प्रोजेक्ट मॅनेजर कीर्तीकुमार भोजक व राजकुमार जगताप यांनी कामाची यंत्रणा वाढवून उर्वरित काम मुदतीत पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
नगरसेवकांच्या तक्रारीप्रमाणे प्रत्यक्ष जाग्यावर काम झाले नसल्यास ते पुन्हा खुदाई करून दर्जेदार काम करून घ्यावे. दर आठवड्याला स्थायी समितीला कामाचा बारचार्ट द्यावा. कंपनीने वेळेत काम केले नाही तर त्यांना दंड आकारला जाईल, असे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका, गटनेता सत्यजित कदम, पूजा नाईकनवरे, माधुरी लाड, नगरसेवक राजाराम गायकवाड, नियाज खान, सचिन पाटील यांनी आपल्या सूचना मांडल्या. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगरसेवक सचिन पाटील, संदीप कवाळे, जय पटकारे, पूजा नाईकनवरे, दीपा मगदूम, माधुरी लाड, प्रतिज्ञा उत्तुरे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, सहायक अभियंता आर. बी. गायकवाड, शाखा अभियंता वाय. व्ही. पाटील, जयेश जाधव, राजेंद्र हुजरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पी. डी. माने उपस्थित होते.* कामाची सद्य:स्थिती -- कामाची वर्कआॅर्डर १ सप्टेंबर २०१८, मुदत ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत.- एकूण ४३० कि. मी. पैकी १११ कि.मी.चे काम पूर्ण- ९ महिने शिल्लक असून, ३१९ कि.मी. पाईप टाकणे व टाक्या बांधणे बाकी- १२ पैकी ५ टाक्यांची खुदाई पुर्ण, पुईखडी टाकीच्या फौंडेशनचे काम सुरू