कोल्हापूर : समाजात सध्या निर्माण झालेली अस्वस्थता शिक्षण आणि शेती व्यवस्थेतील दुरावस्थेशी संबंधित आहे. समाज, नवी पिढी घडविण्याची ताकद असलेली शिक्षणव्यवस्था मोडीत निघत आहे. याबाबतची खदखद विविध जाती, संस्था-संघटनांच्या आधारे मोर्चे, मेळावे आदींद्वारे व्यक्त होत आहे. समाजातील अस्वस्थता दूर करण्यासह शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक, सेवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी सोमवारी येथे केले.येथील कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित सेवानिवृत्त सभासदांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्ही. टी. पाटील सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, तर जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार, प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह नाना गोखले प्रमुख उपस्थित होते.संपादक भोसले म्हणाले, शिक्षण व्यवस्थेची वाटचाल सध्या बिकट झाली आहे. सरकारी शाळा, महाविद्यालयांना खासगी स्वरुपातील समांतर व्यवस्था निर्माण झाली आहे.जिल्हा कोषागार अधिकारी लिधडे, जिल्हा उपनिबंधक काकडे, प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह नाना गोखले, सेवानिवृत्त शिक्षक टी. एस. पाटील, सर्जेराव घाटगे यांनी मनोगत व्यक्त केली. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त संजय मगदूम आणि १४५ सेवानिवृत्त सभासदांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील, नगरसेवक अशोक जाधव, के. के. पाटील, उदय पाटील आदींसह संचालक उपस्थित होते. संस्थेचे सभापती कृष्णात पाटील यांनी स्वागत केले. तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. उपसभापती गंगाराम हजारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
शिक्षण व्यवस्था सुधारणेसाठी योगदान द्यावे
By admin | Published: October 18, 2016 1:22 AM