एकनाथ पाटील ।कोल्हापूर : राजारामपुरीतील भारत को-आॅप. हौसिंग सोसायटीच्या भाडेकरू गृहनिर्माण संस्थेमधील साडेसहा गुंठे जागेचा ताबा गुंडांना सुपारी देऊन जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयितांवर एक महिन्यापूर्वी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजारामपुरीचे पोलीसच संशयितांना अभय देत असल्याने कुटुंबीय भयभीत झाले आहे. फिर्यादी अभिनंदन अप्पासाहेब पाटील (रा. राजारामपुरी) यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे अखेर दाद मागितली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात संशयितांवर ७ एप्रिलला गुन्हा दाखल झाला असला तरी महिन्यापासून ते पाठपुरावा करीत आहेत. परंतु राजारामपुरी पोलिसांनी कागदावरच हा तपास ठेवला असून, संशयितांना अद्यापही अटक केलेली नाही. संशयित अर्चना अरुण पाटील, अनिल चवगोंडा पाटील, सुभाष बाबूराव कुंभोजकर, विशाल सुभाष कुंभोजकर, राजश्री अनिल पाटील (सर्व रा. विश्रामबाग, सांगली), अरुण भालचंद्र पाटील (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांच्यासह अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. आयर्विन ख्रिश्चन हॉस्टेल कंपाउंडमधील जागा खाली करून देण्यासाठी सुपारी घेणाऱ्या राजारामपुरीतील सराईत गुंडानेच या जागेचीही सुपारी घेतली आहे.
फिर्यादी अभिनंदन पाटील हे आई राजमाता, पत्नी सुप्रिया, दीड वर्षाची मुलगी वरदा असे राहतात. त्यांची कब्जेवहिवाटीची राजारामपुरीतील भारत को-आॅप. हौसिंग सोसायटी या भाडेकरू गृहनिर्माण संस्थेत प्लॉट नंबर ३३ मध्ये साडेसहा गुंठ्यांचा प्लॉट आहे. ही जागा भारत हौसिंग सोसायटीच्या मालकीची आहे. ती अभिनंदन पाटील यांना भाडेतत्त्वावर दिली आहे. या मिळकतीवरून त्यांचा व काकू अर्चना पाटील यांचा वाद आहे. त्यांच्या विरोधात सहकार न्यायालयामध्ये मनाई दावा दाखल केला आहे. तसेच संशयित अर्चना पाटील यांनी भारत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सहसभासदत्वाचा राजीनामा दिला आहे. तो संस्थेने मंजूर केला आहे. त्यांनी सदर प्लॉटच्या हस्तांतरणाचा व त्यानंतर विभाजन करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले; परंतु विभाजन होऊ शकत नाही, असे निर्णय झाले.
अभिनंदन पाटील व त्यांचे कुटुंबीय परवानगी देत नाहीत म्हणून १२ जानेवारी २०१९ रोजी संशयित मिळकतीमध्ये बेकायदेशीरपणे गुंडांना घेऊन घुसले. गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला. हातामध्ये चाकू, हातोडा, कटावणी, टॉमी, पाईप घेऊन आलेल्या गुंडांना पाहून अभिनंदन पाटील यांच्यासह कुटुंबीय भयभीत झाले. त्यानंतर अंगणामध्ये बेकायदेशीरपणे बॅरिकेट लावून त्यांनी जागेचे विभाजन केले.यावेळी घरात घुसलेल्या गुंडांनी प्रापंचिक साहित्य चोरून नेले. हा संपूर्ण प्रकार येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. आजही या गुंडांचा या परिसरात वावर आहे.दोघा पोलिसांचा समावेशजागेचा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील दोघा पोलिसांचाही समावेश आहे. जागेचा ताबा घेताना दोन पोलीस साध्या वेशात होते. गुंडांना आत पाठवून ते दुचाकीवरून निघून गेले. येथील बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते पोलीस स्पष्टपणे दिसत आहेत. बेकायदेशीरपणे कुळे काढणाºया गुंडांना अभय देणाºया ‘त्या’ दोघा पोलिसांवर पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.