लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी डेक्कन मिल परिसरातील २५ अतिक्रमणे काढली. यावेळी काहीजणांनी पथकाबरोबर वाद घातला. हा वाद सुमारे चार तास सुरू होता. अखेर पथकाने सर्वच अतिक्रमणे काढल्याने वातावरण शांत झाले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा भरणारा दररोजचा बाजारही हटविला. त्यामुळे हा परिसर मोकळा श्वास घेत आहे.
शहरात वाढलेल्या अतिक्रमणांबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. त्याची दखल घेत नगरपालिकेने गत चार दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी डेक्कन मिल येथे सकाळी साडेदहा वाजण्याच्यासुमारास दररोजचा भाजीपाल्याचा बाजार उठवून त्यांना पर्यायी जागा देण्याचे सांगत तेथून हटवले.
डेक्कन परिसरातील फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांना कारवाईआधी अतिक्रमण विभागाने आपले अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काहींनी स्वत:हून अतिक्रमण काढले होते. मात्र, एका ठिकाणी काही राजकीय व्यक्तीच्या दबावापोटी अतिक्रमण काढताना वादावादीचा प्रकार सुरू झाला. या हस्तक्षेपामुळे तेथे सुमारे चार तास अतिक्रमण काढण्यावरुन वाद सुरू होता. अखेर पथकाने ते अतिक्रमण काढले. त्यामुळे संपूर्ण डेक्कन रस्ता परिसर अतिक्रमणमुक्त झाला.
चौकट
राजकीय हस्तक्षेप
अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत कारवाई सुरू करण्यात आली असली, तरी अनेक ठिकाणी राजकीय व्यक्तींकडून हस्तक्षेप केला जातो. त्यामुळे कारवाईत अडचणी येत आहेत. शहराला विद्रुप करणाऱ्या अशा प्रवृत्तींना यापुढे निवडून देऊ नये, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
(फोटो ओळी)
२८१२२०२०-आयसीएच-०७
इचलकरंजीतील डेक्कन मिल परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत कारवाई करताना काहीजणांनी वादविवाद करत पथकाबरोबर हुज्जत घातली. त्यामुळे मोठी गर्दी जमली होती.
२८१२२०२०-आयसीएच-०८
डेक्कन मिल परिसरातील अतिक्रमण नगरपालिकेने हटवले.