इचलकरंजी : नगरपालिकेने ‘मुव्हेबल दुकानगाळा’ या नावाखाली शहरातील मोक्याच्या ठिकाणी फेरीवाल्यांना दिलेले गाळे आता वादग्रस्त ठरू लागले आहेत. हे दुकानगाळे मुव्हेबल नसल्याने आणि त्यांना असलेल्या अटी व नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे पालिकेसमोर एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे. विविध शहरांमध्ये फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फेरीवाला धोरण सन २००९ मध्ये जाहीर केले. नगरपालिकेकडील अटी व शर्तींना अधीन राहून संबंधित फेरीवाल्यांना पालिका निश्चित केलेल्या जागेवर मुव्हेबल दुकानगाळे उभारण्यास नगरपालिका ना हरकत दाखला देते. हे दाखले मुख्याधिकारी तथा शहर फेरीवाला समितीचे अध्यक्ष यांनी द्यावयाचे आहेत.मुव्हेबल दुकानगाळेधारकांचा अन्न भेसळ व औषध खात्याचा दुकान नोंदणी व कायद्यानुसार आवश्यक परवाना आहे. जलशुद्धिकरण प्रक्रियेद्वारे शुद्ध केलेल्या किंवा नगरपालिकेमार्फत वितरित केलेल्या पाण्याचा वापर बंधनकारक आहे. अन्नपदार्थ उघडे ठेऊ नयेत. ओला व सुका कचरा स्वतंत्ररीत्या गोळा करून नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये देण्याचे आहे. मुव्हेबल गाळा किंवा जागा दुसऱ्याला परस्पर देता येणार नाही. या जागेवर कायमस्वरूपी बांधकाम करावयाचे नाही. गाळ्याच्या ठिकाणी खुर्च्या व टेबल लावू नयेत. ना हरकत दाखल्याची मुदत दहा वर्षांची असून, या कालावधीमध्ये नगरपालिका निश्चित करून देईल, त्याठिकाणी विनातक्रार जावे लागेल. पालिकेच्या आवश्यकतेनुसार विनातक्रार जागा खाली करून द्यावयाची आहे. परवानाधारकाने स्वत:ची किंवा त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीची नियमित वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे. व्यवसायाच्या ठिकाणी बालमजूर ठेवता येणार नाहीत, अशा प्रकारच्या शर्ती व अटी यांना अधीन राहून नगरपालिकेने परवाने दिले आहेत. मुव्हेबल दुकानगाळे उभारताना त्याचा अर्थ जनतेस आणि संबंधित फेरीवाल्यास मुख्याधिकाऱ्यांनी सांगावा, असेही संकेत आहेत. मात्र, सुंदर बाग व राजाराम स्टेडियमजवळ उभारण्यात आलेले हे दुकानगाळे पक्क्या बांधकामाचे असल्याबद्दलची तक्रार नागरिकांतून होऊ लागली आहे. सुंदर बागेजवळील दुकानगाळ्यांमध्ये तर अनेक गाळेधारकांनी आतमध्ये महागडी मार्बलची फरशी बसवून घेतली असून, आकर्षक असे लायटिंगही केले आहे, असे असताना याकडे पालिका मात्र दुर्लक्ष करीत आहे. त्याचबरोबर मुव्हेबल दुकान गाळ्यांमध्ये विहीर व कूपनलिकेचे पाणी राजरोसपणे वापरले जात आहे, तर कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे पडल्याचे दिसून येत आहे. याबाबतची कोणतीही यंत्रणा नगरपालिकेकडे नाही, अशा परिस्थितीमध्ये नजीकच्या काळात खाद्यपदार्थ व पाण्यामार्फत नागरिकांना काही इजा पोहोचल्यास नगरपालिका कोणती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार आहे, असाही प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)वादग्रस्त फेरीवाला झोनसुंदर बागेजवळ अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुखांचे कार्यालय, महावितरण कंपनीचे शहर कार्यालय व पोस्टाचे प्रधान कार्यालय आहे. या ठिकाणी नागरिकांचा सतत राबता आहे. याबरोबर बागेमध्ये ये-जा करणाऱ्या महिला व लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. अशा परिस्थितीमध्ये मुव्हेबल दुकानगाळ्यांकडे होणारी गर्दी पाहता हा रस्ता बऱ्याचवेळा वाहतुकीस बंद होतो. त्यामुळे याठिकाणी फेरीवाला झोनसाठी नगरपालिकेने मंजुरी कशी दिली, याचे रहस्य सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे.
मुव्हेबल दुकानगाळे ठरताहेत वादग्रस्त
By admin | Published: October 12, 2015 10:47 PM