डॉ. वसंत भोसले कोल्हापूर : कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनने पाणी देण्याची योजना पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे म्हणून आखण्यात आली आणि अखेर ती पूर्ण करून येत्या सप्टेंबरमध्ये पाणीसुद्धा देण्यात येईल. याच धर्तीवर इचलकरंजी महापालिका क्षेत्रासाठी थेट पाइपलाइनने पाणी द्यावे, अशी मागणी होत आहे. तर त्याला विरोध करण्यासाठी रक्तपाताची भाषा करण्यात येत आहे.
कागल तालुक्यातील सुळकुड येथून दूधगंगा नदीतील पाणी उपसण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. काळम्मावाडी धरणातून जे दूधगंगा नदीमध्ये पाणी सोडण्यात येते ते पाणी उपसल्याने कागल तालुक्याला तसेच हातकणंगले, शिरोळ तालुक्याला आणि निपाणी तालुक्याला देखील पाणी कमी पडणार नाही. मात्र, आमचे पाणी इचलकरंजीला कसे देता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे.वास्तविक यावर्षी काळम्मावाडीच्या गळतीमुळे सहा टीएमसी पाणी धरणामध्ये कमी अडवण्यात आले आले. इतके पाणी कमी अडवून देखील पाणी कमी पडण्याची चिन्हे दिसत नाहीत किंवा तशी चर्चाही होत नाही. गळती काढल्यानंतर पुन्हा पूर्ण क्षमतेने धरण भरेल. सहा टीएमसी वाया जाणारे पाणी अडवले जाईल इतके पाणी असताना सुळकुड धरणातून इचलकरंजीला पाणी देण्यामध्ये काय हरकत आहे? सुळकुड येथून दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणी द्यायचे नाही यासाठी कागल, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ, भुदरगड आणि निपाणी तालुक्यातील नेतेमंडळी एकत्र येऊ लागली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत या सहा तालुक्यांतील नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हसन मुश्रीफ म्हणतात सुळकूडचा हट्ट सोडा अन्यथा रक्तपात होईल! एका ज्येष्ठ मंत्र्यांच्या तोंडून अशाप्रकारची भाषा बाहेर पडल्यानंतर आश्चर्य वाटते. इचलकरंजीला पंचगंगा नदी आहे. त्या नदीमध्ये भरपूर पाणी आहे पण ते पाणी प्रदूषित आहे म्हणून कृष्णा नदीतून पाणी आणण्यात आले. आता वारणा किंवा दूधगंगा नदीतून पाणी आणण्याचा अट्टाहास चालू आहे. जर पंचगंगा नदीला पाणी असून देखील ते दूषित होत असेल तर ही पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याची जबाबदारी कोणाची? कोल्हापूरला थेट पाईपलाईनने पाणी दिले तिथला प्रश्न मिटला. उद्या इचलकरंजीला देण्याची मागणी करतात तिथला प्रश्न मिटला. कोल्हापूर महापालिका क्षेत्र आणि इचलकरंजी महापालिका क्षेत्राच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न थेट पाईपलाईनने सोडवला तर बाकीच्या गावांनी सुद्धा थेट पाईपलाईन टाकायची का? पंचगंगेचे प्रदूषण दोन वर्षांत सोडवू, तीन वर्षांत असे वारंवार तुम्ही सांगत आलेला आहात. कित्येक वर्षे गेली. अनेक आंदोलने झाली. सुळकुडवरून किंवा दानोळीवरून थेट पाईपलाईनने पाणी देण्यापेक्षा पंचंगेचे प्रदूषण संपवणे अवघड आहे का? ते अशक्य आहे का? आजवर तुम्ही जी आश्वासने दिली ती खोटी होती का? पंचगंगा प्रदूषणमुक्तीचे अनेक आराखडे तयार करण्यात आले ते तयार करणारे अधिकारी खोटे बोलत होते का? आज पंचगंगेचे पाणी माणसालाच नव्हे तर पशुपक्ष्यांना आणि शेतीलासुद्धा देण्यायोग्य राहिलेले नाही अशा प्रकारे आपल्या जवळ असलेल्या आपल्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या नदीला आपण कायमचे बाद करणार आणि लोकांच्या मध्ये भांडण लावून थेट पाईपलाईनसाठी पैसे आणणार त्याची कंत्राटे मिळवणार आणि ती योजना चालवण्यासाठी सातत्याने विजेचा खर्च करत राहणार. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मंत्रिमंडळात असलेले नेते आहेत. भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील पाच वर्षे राज्य मंत्रिमंडळात दुसऱ्या नंबरचे मंत्री होते.त्यांच्याकडे विविध चार महत्त्वाची खाती होती, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे काही वर्षे ते पालकमंत्री होते, त्यांनीदेखील पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी काहीही केले नाही. थेट पाइपलाइन आणून कोल्हापूरकरांच्यावर आश्वासनांची बरसात करणारे सतेज पाटील हेदेखील अनेक वर्षे मंत्री आहेत, काही वर्षे पालकमंत्री होते त्या काळातदेखील पंचगंगेचे प्रदूषण संपले नाही. ही सर्व नेतेमंडळी सत्तेत असूनही साधे पंचगंगा नदीचे प्रदूषण संपत नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ४२ टक्केच आतापर्यंत पाऊस झाला असला तरी ही १५च्या १५ धरणे भरली आहेत इतकं विपुल पाणी आपल्याला मिळत असूनदेखील केवळ राजकारण्यांच्या फालतू आश्वासनाने आणि राज्यकारभाराने पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होऊ शकत नाही. कोल्हापूर आणि इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडवत असताना या सहा तालुक्यांतील खेड्यांत राहणाऱ्या लोकांचे काय करणार? त्या लोकांचा प्रश्न कसा सोडवणार? भविष्यात दूधगंगा नदी प्रदूषित होणारच नाही, याची काही गॅरंटी आहे का? याची काही खात्री आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावे लागतील आणि सत्तेत असताना रक्तपात घडेल अशा प्रकारची धमकी देणे म्हणजे तुमच्या नेतृत्वाचे दिवाळे निघाले आहे असेच म्हणावे लागेल.राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी सीमा भागातल्या लोकांचा कळवळा आणून तुम्हाला पाणी कमी पडेल तुम्ही तलवारी घेऊन बाहेर पडा अशी भाषा वापरणे म्हणजे अराजकतेला तुम्ही निमंत्रण देत आहात ही भाषा आणि तुमचं नेतृत्व हे मान्य होणार नाही. तुम्हाला एकही प्रश्न गेल्या काही दशकांमध्ये सोडवता आलेला नाही.
कोल्हापूरचा एकही प्रश्न अलीकडच्या काळात तुम्ही नेत्यांनी सोडवलेला नाही आणि आज रक्तपाताची भाषा करता. गैबीचा बोगदा झाला तेव्हा सुद्धा विनाकारण पाण्याचा वाद निर्माण करून ठेवलात, वास्तविक कोल्हापूर जिल्ह्याला संपणार नाही इतके पाणी आहे. कुठल्याही जिल्ह्याच्या काेणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही पाणी योजना करा, कोल्हापूर जिल्ह्याचे पाणी कमी पडणार नाही. रक्तपाताच्या ऐवजी विधायक आणि ठाम धोरण घेऊन कोल्हापूरसाठी काहीतरी करा, लोक तुमचा जय जयकार करतील.
कोल्हापूरसाठी तुम्ही काय केले ते सांगा?
तुम्हाला कोल्हापूरला नाट्यगृह बांधता आलं नाही. पंचगंगा नदीचा प्रदूषणाचा प्रश्न सोडवता आला नाही. तुम्हाला कोल्हापूर शहराची हद्दवाढ करता आली नाही. कोल्हापूरला कोणताही मोठा प्रकल्प आणता आला नाही. तुमच्या नावाने सांगावे अशी कोणती कामे तुम्ही केलीत? पोलिस स्टेशनला फोन करून आपल्या कार्यकर्त्यांना सोडून देण्याचा दाब देण्यापुरतं तुमची जर कामे असतील तर तुम्हाला ती लखलाभ हो.
शाहू महाराजांचे समाधी स्मारक पूर्ण होण्यासाठी पुण्यतिथीचे शतक उजाडावे लागले यापेक्षा दुर्दैव ते काय? मराठा समाजाला भवन बांधण्यासाठी तुम्हाला जागा देता येत नाही आणि कोल्हापुरात एका वादग्रस्त ट्रस्टची ५५ एकर जागा कोणीही फुकापारसी अतिक्रमण करून बळकावत असताना ती अडवता येत नाही