कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त साखर कारखान्याच्या अवसायन काळातील व्याजमाफीवरून जिल्हा बॅँकेचे ज्येष्ठ संचालक विनय कोरे व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्यात जिल्हा बॅँकेच्या शुक्रवारी झालेल्या औद्योगिक समितीच्या बैठकीत वादंग झाले. ‘दत्त’चे अवसायन काळातील व्याज जिल्हा बॅँकेने घेतले नसल्याने बॅँकेचा सुमारे ६० कोटींचा तोटा झाल्याचे निदर्शनास आणून देत यासंबंधीची याचिका मागे घेतल्याबद्दल कोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. अवसायन काळातील व्याज घेऊ नये, असा सहकार कायदा सांगत असला तरी याबाबत न्यायालय काय निर्णय घ्यायचे ते घेऊ दे; याचिका मागे घेऊ नका, असा कोरे यांचा आग्रह होता; पण व्याजमाफीबाबत प्रशासक काळात ना हरकत दाखला दिला आहे. त्यात सहकार कायद्यानुसार याचिका मागे घेतल्याचे बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांचे म्हणणे आहे. बॅँकेने व्याज माफ न करता ते कारखान्याच्या संचालक मंडळाकडून वसूल करून घ्यावे, असा कोरे यांचा आग्रह आहे. हे प्रकरण गेले पंधरा दिवस बॅँकेत गाजत आहे. त्यात शुक्रवारी बॅँकेत औद्योगिक विभागाची बैठक होती. कोरे हे पन्हाळ्यातील चार-पाच संस्थांच्या कर्जांबाबत बॅँकेत आले होते. तिथे बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर हेही उपस्थित होते. यावेळी कोरे व पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचे समजते. अखेर अध्यक्ष मुश्रीफ यांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकल्याचे समजते. दोन सत्ताधारी संचालकांमधील वादाची चर्चा शुक्रवारी दिवसभर बॅँकेच्या वर्तुळात सुरू होती. (प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाची किनार!विधानसभा निवडणुकीत पन्हाळा-शाहूवाडीतून विनय कोरे यांचा निसटता पराभव झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीतर्फे बाबासाहेब पाटील हेही रिंगणात होते. त्याचा राग कोरे यांच्या मनात आहे. गेल्या आठवड्यात पन्हाळा तालुक्यातील एका संस्थेला कर्ज देण्यास पाटील यांनी थेट विरोध केल्याने दोघांमधील वितुष्ट वाढत गेले. याबाबत बाबासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी असा वाद आमच्यात झाला नसल्याचे सागिंतले.
विनय कोरे-बाबासाहेब पाटील यांच्यात वाद
By admin | Published: August 13, 2016 12:51 AM