मुरगूड : कागल तालुक्यातील करंजिवणे गावच्या हद्दीत असणाऱ्या तलावातून गुरुवारी संध्याकाळी हळदवडे गावासाठी कालव्यातून सोडलेले पाणी बेकायदेशीर आहे, असा आरोप करून पाटबंधारे अधिकाऱ्यांना जाब विचारून ते पाणी तत्काळ बंद करण्यास करंजिवणे ग्रामस्थांनी भाग पाडले. ही बातमी ज्यावेळी हळदवडे ग्रामस्थांना समजली. त्यावेळी त्यांनी या प्रकारचा निषेध करीत रात्री उशिरा कापशी-मुरगूड रस्त्यावर रास्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने रास्ता रोको रात्री साडेअकरा वाजता हळदवडेकरांनी स्थगित केला. शुक्रवारी सकाळी मात्र करंजिवणे गावातील शेकडो ग्रामस्थांनी मुरगूडच्या पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. गुरुवारी हळदवडे गावातील ग्रामस्थांनी आपल्याला पाणी पाहिजे, असे सांगून निढोरी येथील पाटबंधारे कार्यालयात रितसर पाणीपट्टी भरून कालव्यातून आणि ओढ्यातून पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी रितसर या तलावातून पाणी सोडले होते. सुमारे दोन तासांनंतर ही बातमी करंजिवणे ग्रामस्थांना समजली. त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ तलावावर जमले आणि तेथूनच पाटबंधारे विभागातील अधिकारी डी. बी. दारवाडकर यांच्याशी संपर्क साधला आणि कालव्यातून सोडलेले पाणी बंद करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थ संतप्त झालेले पाहून, दारवाडकरांनी कालव्यातून सोडलेले पाणी तत्काळ बंद केले.रितसर परवानगी घेऊन व पाणीपट्टी भरून सोडलेले पाणी करंजिवणेकरांनी बंद केले. ही बातमी हळदवडे गावात समजली. त्यावेळी ग्रामस्थ संतप्त झाले आणि गुरुवारी रात्री १0 वाजता मुरगूड-कापशी रस्त्यावर एकत्र येऊन अचानक रास्ता रोको सुरू केला. शुक्रवारी दोन्ही गावांतील नागरिकांनी सकाळी दहा वाजता मुरगूड पोलिस ठाण्याच्या दारात ठिय्या मांडला. यामध्ये करंजिवणे ग्रामस्थांची संख्या जास्त होती. दरम्यान, पाटबंधारे अधिकारी डी. बी. दारवाडकर, उत्तम कापशे पोलिस ठाण्यात आल्यानंतर करंजिवणे ग्रामस्थांनी त्याच्यावर पैसे घेऊन तुम्ही कालव्यातून पाणी सोडला असल्याचा आरोप केला. दरम्यान, करंजिवणेकर ग्रामस्थांनी कालव्यातून पाणी सोडून हळदवडे ग्रामस्थ आपल्या खासगी विहिरी भरून घेतात. त्यामुळे पाणी अजिबात सोडू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.तलावात पुरेशे पाणीसध्या तलावात समाधानकारक पाणीसाठा असून, सर्व गावांना पिण्याचे पाणी देऊन हळदवडे आणि करंजिवणे या दोन्ही गावांतील शेतीला योग्य पाणी नियोजन करून देता येईल; पण असा वाद निर्माण होत असल्याने नाइलाजास्तव कालव्यातील पाणीपुरवठा बंद करावा लागणार असल्याची माहिती डी. बी. दारवाडकर यांनी दिली. पाणी संस्था बोगस असल्याचा आरोपदरम्यान, तलावातील पाणी शेतीला देण्यासाठी किसान पाणी संस्था या नावाने संस्था स्थापन केली होती. यामध्ये हळदीचे सहा सदस्य आणि हळदवडे व करंजिवणे गावांतील तीन सदस्य होते. पण, गेल्या अनेक वर्षांपासून सदरची संस्था बंदच असून, या संस्थेच्या नावाखाली बोगस कामे होत असल्याचा आरोप हळदवडे ग्रामस्थांनी केला आहे.
करंजिवणे-हळदवडे ग्रामस्थांमध्ये वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2017 12:29 AM