कोल्हापूर : इचलकरंजीतील आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जनाची भूमिका घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी कठोर भूमिका घेत लोकप्रतिनिधींनाच खडेबोल सुनावले आहेत. अन् गणेश मंडळांसह नागरिकांनी पर्यावरणपुरकच गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.जिल्हाधिकारी राहूल रेखावार म्हणाले, कोल्हापूरला पर्यावरणपुरक गणेश विसर्जनाची परंपरा असताना लोकप्रतिनिधींनी व ठराविक संस्था व मंडळांनी पंचगंगा नदीतच गणेश विसर्जनाची भूमिका घेणे हे पर्यावरण व सामाजिक चळवळीसाठी घातक आहे. वाहत्या पाण्यातच विसर्जन करावे, मूर्ती एकावर एक पडू नये अशा दिशाभूल करणाऱ्या, अंधश्रद्धेच्या संकल्पना पसरवण्याचा प्रयत्न करू नये. नदी प्रदुषण रोखणे ही सर्वांची विशेषत: लोकप्रतिनिधींनीची तर अधिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी पंचगंगेत मूर्ती विसर्जनाचा आग्रह न धरता प्रशासनाने साेय केलेल्या ठिकाणीच गणेशमूर्ती विसर्जित करावी.कोल्हापुरात गेल्या १५ वर्षांपासून पर्यावरणपुरक गणेशमूर्ती विसर्जनाची परंपरा असताना इचलकरंजीतील आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जनाची भूमिका घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यामुळे पंचगंगेचे प्रदुषण होणार असल्याने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. एवढ्या दिवसात सामोपचाराने, चर्चेने, लोकप्रतिनिधींना समजावून सांगून, कायद्याचा आधार घेवून , विसर्जनाचे पर्याय देऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आता विसर्जनाला तीन दिवस राहिल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत कडक शब्दांमध्ये आपले म्हणणे नागरिकांसमोर मांडले.प्रशासनाकडून जय्यत तयारीइचलकरंजी शहरातील गणेश विसर्जनासंदर्भात निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. गणेशभक्तांना स्वच्छ पाण्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पाच मोठ्या शेततळ्यांसह ७२ कुंडांची सोय केली जात आहे. त्यामध्ये एकूण २० दशलक्ष लिटर पाणी वापरले जाणार आहे. संपूर्ण विसर्जनाची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे सव्वाकोटी रुपयांवर खर्च येणार आहे.शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी प्रांत कार्यालयजवळ, जुना सांगली नाका चौक, नदीवेस रोडवर उजव्या बाजूला असलेल्या एका ट्रेडर्सजवळ आणि नदीवरील रेणुकामाता मंदिरच्या बाजूला असे चार मोठे शेततळे निर्माण केले आहेत. तर रेणुकामाता मंदिरसमोर घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शेततळे निर्माण केले आहे. त्याचबरोबर शहरातील विविध ७२ ठिकाणी मोठे प्लास्टिकचे कुंड विसर्जनासाठी सज्ज ठेवले जाणार आहेत.
कोल्हापुरात गणेश विसर्जनावरुन वाद, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कठोर भूमिका; म्हणाले..
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 02, 2022 2:27 PM