इचलकरंजी : येथील एका महाविद्यालयात धार्मिक पेहराव करण्यावरुन आज, शुक्रवारी वाद निर्माण झाला. यावेळी दोन्ही समाजाचे समर्थक महाविद्यालयासमोर मोठ्या संख्येने जमले. दोन्हींकडून जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींची प्राचार्यांच्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली. पेहरावाबाबत सोमवारीपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी, महाविद्यालयात सकाळी दोन महाविद्यालयीन युवक भगवे स्कार्प घालून आले होते. त्यावेळी त्यांना सुरक्षारक्षाक आणि शिक्षकांनी प्रवेशद्वारात अडवले. यावेळी वाद झाला. दरम्यान हिजाब घालून आलेल्या काही महाविद्यालयीन विद्यार्थिनींनाही प्रवेशद्वारात थांबवण्यात आले. याबाबतची माहिती समजताच दोन्ही समाजाचे समर्थक मोठ्या संख्येने महाविद्यालयाबाहेर जमा झाल्याने तणाव निर्माण झाला.
घटनेची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, निरीक्षक राजू ताशिलदार, सत्यवान हाके, प्रविण खानपुरे हे स्ट्रायकींग फोर्ससह घटनास्थळी दाखल झाले. दिवसभर महाविद्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.