कोल्हापूर : ‘मी सकाळी येथून जाताना टोल सुरू नव्हता. आता सायंकाळी जाताना अचानक टोल कसा सुरू करता? टोल सुरू करण्याची कल्पना तुम्ही पेपरमधून प्रसिद्ध केली पाहिजे. अचानक कसे काय तुम्ही टोल सुरू करू शकता?’ असा वाद वाहनधारकांची येथील कर्मचाऱ्यांसोबत घातल्याने आज, सोमवारी सरनोबतवाडी येथील टोलनाक्यावर काही वेळ वातावरण तंग झाले होते. शेवटी कर्मचाऱ्यांनी नमते घेऊन टोल न घेताच वाहने सोडून दिली. सरनोबतवाडी नाका येथे आज सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एस.आर.पी.चे सात जवान यासह स्थानिक पोलीस ठाण्याच्या सात पोलिसांसह एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. याठिकाणी टोल सुरू झाल्यानंतर सहाच्या सुमारास अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अंकित गोयल हे या टोलनाक्यावर भेट देऊन, संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून, काही काळ या ठिकाणी थांबून निघून गेले. या टोलनाक्यावर कोल्हापूर पासिंगच्या गाड्या टोल न देता तसेच पुढे जात होत्या. यावेळी येथील कर्मचारी बॅरिकेट्स आडवे लावून गाड्या अडविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यांनी टोल न देण्याची भूमिका घेतली. तर काही कोल्हापूर पासिंगच्या वाहनांसह बाहेरच्या जिल्ह्यातील पासिंगच्या वाहनधारकांनी टोल दिला.
सरनोबतवाडी नाक्यावर वादावादी
By admin | Published: June 17, 2014 1:18 AM