कोल्हापूर : शाहू टोलनाक्यावर लोखंडी बॅरिकेट्स चारचाकी वाहनाच्या पाठीमागील बाजूस लागल्यामुळे येथील कर्मचारी आणि वाहनचालक यांच्यात आज, शनिवारी सायंकाळी वादावादी झाली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस वेळीच घटनास्थळी आल्याने हा वाद मिटवण्यात आला. संबंधित चालक कागल तालुक्यातील लोकप्रतिनिधी असल्याचे समजते.सध्या शहरात टोलवरून वातावरण तंग आहे. दोन दिवसांपूर्वी रंकाळा-फुलेवाडीदरम्यान खचलेला रस्ता आणि त्यात आज कळंबा टोलनाक्याप्रश्नी झालेले आंदोलन या ताज्या घडामोडी आहेत. आज सायंकाळी हा लोकप्रतिनिधी चारचाकी घेऊन कागलकडून कोल्हापूरकडे येत होता. त्यावेळी टोलनाक्यावर असलेली लोखंडी बॅरिकेट्स त्याच्या गाडीच्या पाठीमागील बाजूस लागले. त्यावरून टोलनाक्यावरील कर्मचारी व त्या चालकाचा वाद झाला. वाद हळूहळू वाढू लागल्याने तेथील वातावरण तापले. यावेळी तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा प्रकार टोलविरोधी समितीच्या कार्यकर्त्यांना व राजारामपुरी पोलिसांना समजला. समितीचे कार्यकर्ते येण्याअगोदरच पोलीस निरीक्षक अमृत देशमुख हे टोलनाक्यावर आले. त्यांनी वाहनचालकाची व कर्मचाऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर वातावरण निवळले.
शाहू टोलनाक्यावर वादावादी
By admin | Published: October 26, 2014 12:01 AM