कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन ३ आॅगस्टला शाहू सांस्कृतिक मंदिर, शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे होत आहे. बावीस वर्षांनंतर अधिवेशन घेण्याचा कोल्हापूरला मान मिळाला असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला २ आॅगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर, शाहू मार्केट यार्ड येथे जिल्ह्यातील शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान, सहकार, उद्योग, व्यवसाय, आदी क्षेत्रातील नामांकित मान्यवरांचा सत्कार तसेच स्नेहबंधन ते विचारमंथन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ३ आॅगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उद्योगमंत्री नारायण राणे हे खास उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, युवराज संभाजीराजे छत्रपती, वत्सलाताई आण्णासाहेब पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार प्रमुख उपस्थित असतील. दुपारच्या सत्रात विविध मान्यवरांच्या मनोगताचे आयोजन केले असून, आगामी २५ वर्षांच्या शैक्षणिक धोरणाबद्दलच्या तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार असल्याचे वसंतराव मुळीक यांनी सांगितले. स्वागताध्यक्ष उद्योगपती समीर काळे, डॉ. संदीप पाटील, दिलीपराव पाटील, शंकरराव शेळके, शिवाजी पाटील, शैलजा भोसले, चंद्रकांत चव्हाण, शिवाजीराव हिलगे, प्रकाश पाटील, प्रताप पाटील, नीलेश साळोख आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मराठा महासंघाचे ३ आॅगस्टला अधिवेशन
By admin | Published: July 27, 2014 12:49 AM