कोल्हापूर : मराठा समाजातील तरुणांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शुक्रवारी न्यू पॅलेस येथे जाऊन शाहू छत्रपती यांच्याशी संवाद साधला. या भेटीत सारथीच्या स्थापनेच्या हेतूपासून विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी खासदार संभाजीराजे उपस्थित होते.सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निबंधक तथा उपजिल्हाधिकारी अशोक पाटील गुरुवारी कोल्हापुरात आले होते. शुक्रवारी या तिघांनी न्यू पॅलेसवर जाऊन शाहू छत्रपती यांची भेट घेऊन संवाद साधला. निंबाळकर यांचे छत्रपती घराण्याबरोबर जुने स्नेहसंबंध आहेत. त्यामुळे कोल्हापुरात येण्याआधीच शाहू छत्रपतींची भेट ठरली होती.सुमारे तासभर झालेल्या या भेटीत सारथी संस्थेची स्थापनेचा हेतू, संस्थेला मिळणारा निधी, तिची स्वायत्तता, पुढील काळातील संस्थेचे उपक्रम याबरोबरच मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व रोजगार या अनुषंगाने चर्चा झाली.
काही सूचना, मार्गदर्शन असेल तर जरुर द्यावे अशी विनंती अजित निंबाळकर यांनी यावेळी केली. तर संस्थेच्या कामाचे चांगले नियोजन करा आणि अंमलबजावणी योग्य पध्दतीने करावी, मराठा समाजाला न्याय देण्याचे काम होत आहे अशी समाजाची भावना आपल्या कार्यातून होईल याकडे लक्ष द्या, असे शाहू छत्रपती यांनी सांगितले.