कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ दि. २२ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता होणार आहे. विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव, तर बंगलोरच्या नॅशनल असेसमेंट अॅँड अॅक्रिडिटेशन कौन्सिलचे (राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यायन परिषद) संचालक डॉ. एस. सी. शर्मा प्रमुख उपस्थित असणार आहेत. या वर्षी सुमारे ४९ हजार स्नातकांना पदवी प्रदान केली जाणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी बुधवारी दिली.या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी, पदविका प्रमाणपत्र मागणीसाठीचा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जुलै ते सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये राबविण्यात आली. त्याअंतर्गत विद्यापीठाकडे सुमारे ५० हजार अर्ज दाखल झाले. संबंधित प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन राबविण्यात आली. या वर्षी विद्यापीठातर्फे सुमारे ४९ हजार स्नातकांना पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. त्यांतील २४ हजार स्नातक हे प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत.
उर्वरित स्नातकांना पोस्टाद्वारे पदव्या पाठविण्यात येणार आहे. या समारंभाची तयारी सुरू झाली आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार या समारंभाच्या आयोजनाबाबत काही बदल करावे लागणार आहेत. काही नव्या बाबींचा अंतर्भाव करावा लागणार आहे. त्याबाबतचा निर्णय या आठवड्यात होणाऱ्या विद्या परिषदेच्या बैठकीत होईल. या समारंभाची आवश्यक ती माहिती स्नातकांना विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून देण्यात येईल, अशी माहिती संचालक काकडे यांनी दिली.