कोल्हापूर: पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे तयार झालेला महागाईचा भस्मासूर आता थेट स्वयंपाकघरात शिरला आहे. स्थानिक पातळीवर पिकत असल्याने भाजीपाल्याची स्वस्ताई सोडली, तर किचनमध्ये रोजच्या जेवणासाठी लागणारे सर्वच प्रकारचे खाद्यतेल, धान्य, कडधान्ये, डाळींच्या दरात किमान २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात सर्वाधिक वाढ खाद्यतेलात झाली असून पहिल्यांदाच दराने प्रति किलो दीडशेचा टप्पा ओलांडला आहे, यात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
खाद्यतेल स्थानिक पातळीवर मोठ्याप्रमाणावर तयार होत नसल्याने परराज्य व आयातीवर अवलंबून राहावे लागते. मालवाहतूक वाढल्याने खाद्यतेलाच्या दराने गेल्या महिन्यापासून जी उसळी घेतली, ती अजूनही कायम आहे. दोन महिन्यापूर्वी ८० रुपयांवर असणारे सरकी तेल आता १३५ वर पोहोचले आहे. ११० रुपयांवर असणाऱ्या शेंगतेलाने आता १७० रुपये पार केले आहेत. धान्य बाजारातही ज्वारी, गहू, तांदुळ, बाजरी, नाचणी यांचे दर आजवरच्या उच्चांकावर आहेत. दोन महिन्यांपूर्वी ३० ते ४० रुपयांवर असणारी शाळू ज्वारी आता ४० ते ६० रुपये किलोच्या घरात गेली आहे. गव्हाचे दर २२ ते २६ रुपयांपर्यंत खाली आले होते, ते पुन्हा ३२ ते ३६ रुपये झाले आहेत. तांदळाचे दर कमी होत असतानाच, या इंधन दरवाढीमुळे पुन्हा महागाई आणली आहे. तूरडाळ कित्येक दिवसांनंतर १०० च्या आत आली होती, ती पुन्हा १२० वर गेली आहे. मूग १२०, मसूर ८०, चवळी ८०, हरभरा डाळ ७५ असे आजचे दर आहेत.
चौकट ०१
भाजीपाल्याच्या स्वस्ताईने शेतकरी भिकेला
साधारणपणे पूर्वहंगामी, सुरू उसाच्या लावणीत व पाणी मुबलक उपलब्ध असलेल्या ठिकाणी भाजीपाल्याची मोठी लागवड होत असल्याने डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात बाजारात भाजीपाल्याची स्वस्ताई असते, यावर्षीही ती दिसत आहे. वाढलेल्या महागाईचे चटके सोसणाऱ्या ग्राहकांना ही स्वस्ताई दिलासादायक असली तरी, उत्पादक शेतकऱ्यांच्या मात्र डोळ्यात अश्रू आणणारी ठरली आहे. वाढत्या उत्पादन खर्चात आता पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चातील वाढीचीही भर पडल्याने उत्पादन खर्च राहू दे, निदान वाहतूक खर्च निघेल एवढे तरी पैसे मिळावेत, एवढी अपेक्षाही आजच्या घडीला पूर्ण होताना दिसत नाही.
चौकट ०२
खाद्यतेलाच्या दरवाढीला साठेबाजीही कारणीभूत
खाद्यतेलाच्या दरवाढीमध्ये इंधन दरवाढीपेक्षाही बड्या व्यापाऱ्यांकडून होत असलेली साठेबाजी कारणीभूत असल्याची मार्केटमध्ये चर्चा आहे. मोदी सरकारने साठेबाजीवरील नियंत्रण उठविल्याने ज्यांची मोठमोठी गोडामे आहेत, अशा बड्या व्यापाऱ्यांनी माल मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवला आहे. इंधन दरवाढीचे निमित्त सांगून वाढीव दराने त्यांच्याकडून पुरवठा केला जात आहे, त्यामुळेच छोट्या व्यापाऱ्यांनाही दर वाढवून विकण्याशिवाय गत्यंतर राहिलेली नाही.
प्रतिक्रिया...
खाद्यतेलासह धान्य, कडधान्याचे दर वाढत चालले असताना, सरकार म्हणून जी जबाबदारी मोदी सरकारने घ्यायला हवी, ती घेतलेली नाही. बड्या व्यापाऱ्यांना मोकळे मैदान करून देत सर्वसामान्यांचा खिसा रिकामा केला आहे. शिवाय जीएसटी ५ वरून ८ टक्केपर्यंत वाढवला, आयात शुल्कही ८ वरून १२.५० टक्केपर्यंत वाढवले. या सर्वांचा परिणाम आज महागाई वाढण्यात झाला आहे. हे सगळे पाहिल्यावर, सरकार झोपले आहे का? असे म्हणावेसे वाटते.
- संदीप वीर, व्यापारी, कोल्हापूर