उत्तूर : गॅस, कुकर व इलेक्ट्रिक शेगड्या यावर आधारित स्वयंपाक सर्वत्र बनविला जातो; पण पारंपरिक नैसर्गिक साधनांपासून बनविलेल्या जेवणाला गोडीही वेगळीच असते. अलीकडे ‘चुलीवरचे जेवण’ विद्यार्थ्यांबरोबर पालकही विसरत चालले आहेत. याकडेही लक्ष वेधण्यासाठी रविवारी उत्तूर विद्यालयाच्या ५०० विद्यार्थ्यांनी स्वत: जेवण बनविण्याचे धडे घेतले.विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करून आहारातील मेनू बनविण्याचे सांगण्यात आले. ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्या निसर्गरम्य मळ्यात विद्यार्थ्यांनी लाकडाच्या चुलीवर जेवण बनविण्यास सुरुवात केली. अलीकडे घरात धूर नसल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चुलीत फुंकर मारताना डोळे धुराणे भरून यायचे. जवळपास शंभर प्रकारचे खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने तयार केले.स्वयंपाक घरी करताना आपल्या पालकांना कशी कसरत करावी लागते, याचा नमुना विद्यार्थ्यांना जेवण बनविताना आला. काहींना जेवण बनविताना अडचणींचा सामना करावा लागला. दगड, विटांचा चूल बनविण्यासाठी, तर काट्यांचा इंधनासाठी वापर करण्यात आला. साहित्यांची जमवाजमव करताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली.सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांनी स्वयंपाक बनविण्यास सुरुवात केली. दोन तासांत नैसर्गिक साधनांचा वापर करून उत्तम असा स्वयंपाक बनविला. या विद्यार्थ्यांना प्राचार्य राजेंद्र ठाकूर, पर्यवेक्षक ए. व्ही. यमगेकर, पी. के. म्हातुगडे, इंद्रजित बनसोडे, डी. एम. कोळी, आदींसह शिक्षकांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
५०० विद्यार्थ्यांनी बनविला स्वयंपाक
By admin | Published: February 16, 2015 12:13 AM