कोल्हापूर : रासायनिक खत कंपनी व वाहतूकदारांत भाडेवाढीवरून सुरू असलेल्या संघर्षामुळे जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठाच ठप्प झाला असून, त्याचे चटके शेतकऱ्यांना बसू लागले आहेत. वाहतूकदार खत उचलत नसल्याने कंपन्याकडून पुरवठा थांबवण्यात आल्याने गोदामे रिकामी झाली आहेत. दरम्यान, या संकटातून मार्ग काढण्यासाठी कृषी विभागाने मध्यस्थी केली; पण पहिली बैठक निष्फळ ठरली असून आता उद्या शुक्रवारी दुसऱ्यांदा बैठक घेऊन तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत डिझेलच्या दरात लिटरमागे ३५ ते ४० रुपयांची वाढ झाल्याने मालवाहतूकदारांच्या आर्थिक गणितच विस्कटले आहे. यातून रासायनिक खतांची वाहतूक करणारे वाहतूकदारही सुटलेले नाहीत. यातून त्यांनी कंपन्यांकडे डिझेल दरवाढीच्या प्रमाणात वाहतुकीच्या दरात वाढ करावी, अशी मागणी केली, पण कंपन्यांनी गेल्या वर्षी १६ टक्के दरवाढ दिली असल्याने आता केवळ ३ ते ५ टक्केच वाढवू, असे सांगत वाहतूकदारांची १२ टक्के दरवाढीची मागणी धुडकावून लावली. यामुळे चिडलेल्या वाहतूकदारांनी १ जूनपासून खत वाहतुकीवर बहिष्कार टाकल्याने जिल्ह्यातील खतांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
पोलीस बंदोबस्तात वाहतूक करू
खत वाहतुकीचे दर काय असावेत याच्याशी कृषी विभागाचा काहीही संबंध नाही, पण कंपनी व वाहतूकदारांच्या वादामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने जिल्हा अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी स्वत: यात पुढाकार घेत खत कंपन्या व वाहतूक संघटनेची दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. पण येथे दोन्ही बाजू ठाम राहिल्याने तोडगा निघू शकला नाही. आता उद्या बैठक घेऊन अंतिम तोडगा काढण्याचे नियोजन केले आहे. दोघेही आपापल्या मुद्द्यांवर ठाम राहिले तर पोलीस बंदोबस्तात खतांची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वाकुरे यांनी सांगितले.
चौकट
असे असते भाडे
रासायनिक खते घेऊन येणारी रेल्वेची एक वॅगन २६०० टन खत आणते. त्याचा जिल्ह्यात पुरवठा करण्यासाठी जवळपास १०० ट्रक आहेत. त्यांना प्रती किलोमीटर १४ रुपये ४० रुपये या प्रमाणे वाहतूक भाडे देऊन जिल्हाभर पुरवठा होतो. एका ट्रकने १० टन खतांची वाहतूक केली तर पाच ते साडेपाच हजार रुपये मिळतात.
चौकट
जिल्ह्यातील पेर क्षेत्र : ४ लाख हेक्टर
जिल्ह्याला लागणारी खते : २ लाख ८० हजार टन
चौकट
निव्वळ खरिपासाठी लागणारी खते (टनांमध्ये)
युरिया : ७१०००
सल्फेट : १८४००
एमओपी : २४३००
एसएसपी : २०९००
डीएपी : १९५००
संयुक्त : ४३९००
एसटीच्याही पर्यायाचा विचार
कंपन्यांनी १२ टक्के दरवाढीला नकार तर, वाहतूकदार मागणीवर ठाम असल्याने एसटी महामंडळाच्या महाकार्गोद्वारे खतांची वाहतूक करण्याच्या पर्यायाचीही चाचपणी कृषी विभागाने केली आहे. त्यासंदर्भात एसटी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्यासमोर वाहतुकीचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार एकूण वाहतुकीच्या २५ टक्के भाडे देऊ असे सांगितले आहे. पण अजून एसटी महामंडळाकडून निरोप आलेला नाही.
प्रतिक्रिया
डिझेलचे दर वाढतील त्याप्रमाणात भाडेवाढ करावी, असे करारातच नमूद केलेले असतानाही कंपन्या आता हात वर करत आहेत. आम्हाला ५ टक्के वाढीव परवडत नाही, आम्ही मागण्यांवर ठाम आहाेत.
विजय कडवेकर, खत वाहतूकदार संघटना, मार्केट यार्ड कोल्हापूर
प्रतिक्रिया
सध्या खरीप पिकांना खतांची गरज आहे. पाऊस नसल्याने शेतकरी आता थांबला असला तरी एक पाऊस पडला तर लगेच खते द्यावी लागणार आहेत. अशावेळी खतेच उपलब्ध नसल्याने तो आमच्या सेवा केंद्रावर हेलपाटे मारत आहे. खताची मागणी आगाऊ नाेंदवून देखील ती मिळत नसल्याने आम्ही किती जणांनी उत्तरे द्यायची असा पेच आहे.
जयवंत चव्हाण, खत विक्रेता, करनूर (ता. कागल)
(खताचा संग्रहित फोटो वापरावा)