कोल्हापूर : कोरोना संकटात प्रत्येकाने दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी मंगळवारी केले. दूरदृष्यप्रणालीद्वारे दक्षिण मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना त्यांनी कार्यकर्त्यांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठीचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या.
मंत्री पाटील म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन १५ वर्षांआतील मुलांची काळजी घेणे गरजेचे असून त्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना करणे सुरू आहे. गरज पडल्यास कोविड सेंटरसाठी आपल्या भागातील मंगल कार्यालयाची माहिती घेऊन ठेवावी, राजोपाध्येनगर, दुधाळी येथील कोविड सेंटरही लहान मुलांसाठी ठेवण्याबाबत विचार करावा, इस्पुर्ली येथे कोविड सेंटर सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
आमदार ऋतुराज पाटील यांनी, दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक गावात उपाययोजना राबविल्या जात आहेत. गांधीनगर येथील आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यान्वित होत आहे. कोरोनामुक्तीसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, प्रतापसिंह जाधव, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, दऱ्याचे वडगावचे सरपंच अनिल मुळीक, जंबू उपाध्ये यांनी मतदारसंघातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.