राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् को- आॅप. बॅँकेने गेल्या शंभर वर्षांत गरुडभरारी घेतली आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रात या बॅँकेने आदर्शवत कामगिरीने एक वेगळाच दबदबा निर्माण केला असून, राज्यातील पगारदार नोकरांच्या बॅँकांत गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँक नंबर वन राहिली आहे.पगारदार कर्मचाऱ्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी हक्काची क्रेडिट सोसायटी असावी, त्यांनी सावकारांच्या दारात जाऊ नये, या उदात्त हेतूने शाहू महाराज यांच्या प्रेरणेतून भास्करराव जाधव यांनी ३ जुलै १९१७ रोजी ‘करवीर सरकारचे नोकर लोकांची को-आॅप. क्रेडिट सोसायटी लि., पेटा करवीर, इलाखा करवीर’ या नावाने स्थापना केली. त्यावेळी १६ जणांचे आद्यप्रवर्तक मंडळ कार्यरत झाले. केवळ ४५ सभासद, ६६९ रुपयांचे खेळते भांडवल, ३६३ रुपयांची कर्जे व २०० रुपयांच्या ठेवीवर संस्था सुरू झाली. १९२६ ते १९३६ हा दहा वर्षांचा कालखंड संस्थेच्या दृष्टीने प्रगतीचा ठरला. ३० सप्टेंबर १९३४ च्या सर्वसाधारण सभेत पतपेढीचे बॅँकेत रूपांतर केले. त्यानंतर तत्कालीन व्यवस्थापनाने मागे वळून पाहिलेच नाही. १३ जून १९८१ला लक्ष्मीपुरी येथे पहिली शाखा सुरू केली. १९७८-७९ या आर्थिक वर्षापासून मृत सभासदांच्या वारसांना कुटुंब कल्याण निधीतून ३०० रुपये याप्रमाणे बिनव्याजी आर्थिक मदत देण्यास सुरुवात झाली. गडहिंंग्लज, जयसिंगपूर, ताराबाई पार्क, बांबवडे, गारगोटी येथे शाखा सुरू करून कार्यविस्तार वाढविला. २००९ ला गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँकेचे राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँक असे नामांतर झाले. बॅँकेने ३ जुलै २०१६ रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण केले.शाहू महाराज यांच्या प्रेरणेने वाटचाल करत पारदर्शक कारभार, सभासदांशी आपुलकी जपत शंभर वर्षांत बॅँकेने आपला दबदबा कायम राखला आहे. बॅँकिंग क्षेत्रात येणाºया नवनवीन सुविधा, तंत्रज्ञान अवगत करून सभासदांपर्यंत पोहोचविण्याचे काम बॅँकेने केले. मध्यंतरीचा काळ सहकारी बॅँकांसाठी अरिष्टाचा होता. मात्र, कुशल नेतृत्व, उत्तम नियोजनाच्या बळावर बॅँकेने प्रगतीचा चढता आलेख कायम राखला. कोल्हापुरातील आठ शाखांसह सातारा, पुणे, ओरोस (सिंधुदुर्ग) येथे शाखा कार्यरत आहेत. ४५ सभासदांपासून सुरू झालेला बॅँकेचा २२ हजार सभासदांपर्यंतचा प्रवास निश्चितच आदर्शवत आहे.गौरव कारभाराचाबॅँकेला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. यामध्ये नॅशनल फेडरेशन आॅफ अर्बन को-आॅप. अँड क्रेडिट सोसायटी दिल्ली, दि महाराष्टÑ अर्बन बॅँक को-आॅप. बँक्स फेडरेशन, बॅँकिंग फं्रटीयर्स, महाराष्टÑ एम्प्लॉईज को. आॅप. बँक्स असोसिएशन, आदी दिग्गज संस्थांनी बॅँकेचा सन्मान केला. त्याचबरोबर ‘बॅँकिंग फं्रटीयर्स’तर्फे ‘बेस्ट चेअरमन’ पुरस्काराने रवींद्र पंदारे व शशिकांत तिवले यांना, ‘बेस्ट चेअरमन’, ‘बेस्ट कोअर बॅँकिंग प्रणाली’, ‘बेस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी’ या पुरस्काराने सुरेश शिंदे यांना सन्मानित केले.बॅँकेची सामाजिक बांधीलकी : बॅँकेने १९४० मध्ये श्रीमंत पद्माराजे पारितोषिक निधी सुरू केला. त्यातून गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस देऊन गौरव केला जातो. गेल्यावर्षी दुष्काळात महाराष्टÑ होरपळत होता. त्यावेळी बॅँकेचे संचालक व कर्मचाऱ्यांनी दुष्काळ निधीस १ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. तीनशेहून अधिक पूरग्रस्तांना मदत, परितक्त्या-निराधार-अनाथ-गरीब महिलांना प्रशिक्षित केले. अधिक ‘हेल्पर्स आॅफ हॅन्डीकॅप्ड’च्या विद्यालयास ११ हजार १११ रुपये वैयक्तिक मदत दिली. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत शताब्दी वर्षात जन्म घेणाºया मुलींच्या नावे ठेव योजना राबविली.
सहकाराभिमुख ‘गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:18 AM