कोल्हापूर : सहकाराची पंढरी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यांत आता सहकारी तत्वावरील पहिले रुग्णालयही सुरु होत आहे. तुरंबे (ता. राधानगरी) येथील जिजामाता को आॅपरेटिव्ह हॉस्पिटलचे उद्घाटन येत्या ३ फेब्रुवारीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माहिती डॉ. भीष्म सूर्यवंशी,जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हे हॉस्पिटल साकारण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकतरी सहकारी तत्त्वावर चालणारे रुग्णालय असावे, अशी शासनाची भूमिका आहे.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून प्रामुख्याने ग्रामीण जनतेला आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी कोल्हापुरात पहिल्यांदा असे रुग्णालय सुरू करण्यात येत आहे.
४२ बेडनी सुसज्ज अशा या रुग्णालयात आयसीयू, ओपीडी, लॅब तपासणी, आॅर्थोपेडिक, स्त्री रोग, सर्जरी असे विभाग आहेत. सात डॉक्टर तसेच केरळमधील नर्स रुग्णसेवेत कार्यरत असतील. ग्रामीण भागात विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त असल्याने येथे डायलेसिसची सुविधा असणार आहे.
कॅन्सरची लक्षणे आधीच समजावीत यासाटीच्या तपासण्यांवर अधिक भर देण्यात येणार आहे. रुग्णालयासाठी सध्या ५५ ‘अ’ वर्ग आणि ७५० ‘ब’ वर्ग सभासद झाले आहेत. सहकारी साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरणी, नागरी बँका, पतसंस्था, विकास संस्था यांना कायम सभासद करणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांना नाममात्र सभासदत्व देऊन संस्थेचे भागभांडवल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.भागधारकांसाठी ओपीडी बिलासाठी २० टक्के, लॅब टेस्ट बिलावर २० टक्के, एक लाखापर्यंत अपघात विमा संरक्षण, हॉस्पिटल औषध बिलावर ५ टक्के, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम आयसीयूमध्ये २० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
वर्षातून एकदा मधुमेह, ब्लडप्रेशरची मोफत तपासणी, रुग्णवाहिका सेवा मोफत देण्यात येणार आहे. भविष्यात येथे डायग्नोस्टिक सेंटर, सीटी स्कॅन, एक्स रे युनिट, अल्ट्रा साऊंड युनिट, लॅब, डेंटल क्लिनिक, आॅर्थोपेडिक सेंटर, जनरल ओपीडी अशा सेवा सुरू करण्यात येणार आहेत.