‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची ‘इंडियन डेअरी असोसिएशन’च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. देशातील शेती व दूध व्यवसायाबाबत केंद्र सरकारला मार्गदर्शन करण्याची इंडियन डेअरी असोसिएशनची भूमिका आहे. असोसिएशनच्या आतापर्यंतच्या २० अध्यक्षांपैकी नरके हे पहिले शेतकरी प्रतिनिधी आहेत. दूध व्यवसायासमोरील आव्हाने व असोसिएशनची वाटचाल याबाबत नरके यांनी मांडलेली भूमिका...आता नो विधानसभा...!आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी वेळेचे नियोजन कसे केले? असे विचारले असता नरके म्हणाले, ‘लोकसभा, विधानसभेसह सर्वच निवडणुकांत भाग घेणार नाही, हे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे पूर्ण वेळ इंडियन डेअरी असोसिएशनचे काम करणार आहे. महिन्यातील १५ दिवस दिल्लीत राहावे लागणार आहे.’ प्रश्न : तुमची दूध व्यवसायातील वाटचाल कशी राहिली?उत्तर : अॅग्रीक्लचरलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील स्वर्गीय डी. सी. नरके यांच्या आग्रहामुळे शेतीकडे वळलो. त्यावेळी आनंदराव पाटील-चुयेकर यांनी जर्सी व व्होसटन गायी आणल्या होत्या. त्या पाहून दूध व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. अद्ययावत गोठा बांधून २५ ते ४० गायींच्या माध्यमातून दूध व्यवसायास सुरुवात केली. साठ वर्षांपूर्वी आम्ही ‘मुक्त गोठ्या’ची संकल्पना राबविली होती. प्रश्न : दूध संघातील तुमचा प्रवेश कसा होता?उत्तर : शेती आणि दूध व्यवसाय यामध्ये विविध प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरू होता. दूध व शेती व्यवसायांतील अभ्यास पाहून आनंदराव पाटील-चुयेकर यांनी मला दूध संघाच्या संचालक मंडळात घेतले. त्यानंतर चुयेकरसाहेब व मी संघाच्या प्रगतीचा आलेख सातत्याने चढता ठेवला. प्रश्न : दूध संघातील कामाच्या बळावर ‘इंडियन डेअरी असोसिएशन’मध्ये संधी मिळाली?उत्तर : दूध संघात विशेषत: ‘आॅपरेशन फ्लड’ काळात ‘गोकुळ’ने जे उल्लेखनीय काम केले, त्याची दखल घेऊन स्वर्गीय डॉ. वर्गीस कुरियन व अमृता पटेल यांनी माझी शिफारस केली. शेतकऱ्यांचा चेअरमन म्हणून १९९७ला असोसिएशनच्या पश्चिम विभागावर काम करण्याची संधी मिळाली, अशी संधी मिळणारा मी महाराष्ट्रातील पहिला होतो. तिथेही कामाचा ठसा उमटविला आणि थेट असोसिएशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेली सहा वर्षे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. संपूर्ण कार्यकारिणीत मी आणि ‘अमूल’चे पार्थिव भटोर दोघेच शेतकरी व स्वत: दूध व्यवसाय करणारे आहोत. प्रश्न : ‘असोसिएशन’चे नेमके काम कसे चालते?उत्तर : इंडियन डेअरीच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर विभागांतून दूध व्यवसायामध्ये स्थानिक अडचणी येतात. त्यांची छाननी करून केंद्र सरकारला धोरणात्मक मार्गदर्शनाची जबाबदारी असोसिएशनला पार पाडावी लागते. त्याची अंमलबजावणी केंद्र सरकार करते. प्रश्न : दूध व शेती व्यवसायांना आतापर्यंत असोसिएशनचा काय फायदा झाला?उत्तर : असोसिएशनमुळे दूध व्यवसायाला खूप मोठा फायदा झाला आहे. दूध व्यवसाय विक्रीकर मुक्त केला. शेतीला आयकरमधून वगळण्यात असोसिएशनचा खूप मोठा वाटा आहे. दूध व्यवसायाबाबत बोलायचे झाले तर जातिवंत वासरे जन्मास येण्यासाठी आणंद गुजरातमध्ये केंद्र सुरू केले आहे. प्रश्न : ‘गोकुळ’मध्ये जवळपास चार दशके तुम्ही कार्यरत आहात. संघाच्या नावीन्यपूर्ण योजना राष्ट्रीय पातळीवर राबविणार का?उत्तर : सहकाराच्या माध्यमातून ‘गोकुळ’ने सामान्य माणसाच्या जीवनात जी अर्थक्रांती घडविली, ती उल्लेखनीयच आहे. याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली असून, ‘गोकुळ’ने ‘वासरू संगोपन योजना’ प्रभावीपणे राबविली आहे. तिची दखल घेऊन ‘एनडीडीबी’ने संपूर्ण भारतात ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न : अध्यक्षपदाच्या संधीकडे तुम्ही कसे पाहता?उत्तर : स्वर्गीय डी. सी. नरके, आनंदराव पाटील-चुयेकर, डॉ. वर्गीस कुरियन व अमृता पटेल यांचा आशीर्वाद आणि आतापर्यंत केलेल्या कामाच्या शिदोरीवर संधी मिळाली. अध्यक्षपदाचा जेवढा कालावधी मिळेल त्याचे सोने करणार हे नक्की आहे. मी खेळाडू आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आदर्श काम करू. प्रश्न : अध्यक्षपदाच्या माध्यमातून तुमचे नेमके व्हिजन काय आहे?उत्तर : आजपर्यंत चाळीस वर्षे सहकाराच्या माध्यमातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवूनच काम केले. बिनभरवशाच्या शेतीमुळे दूध व्यवसायच शेतकऱ्यांना तारू शकतो. देशातील ८५ टक्के दूध उत्पादक हे एक ते तीन जनावरे पाळणारे आहेत; पण केंद्र सरकारच्या सुविधा या मोठ्या दूध उत्पादकांसाठीच आहेत. या धोरणात बदल करण्यासाठी माझा आग्रह राहील. दूध व्यवसाय हा महिलांच्या हाती असल्याने त्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. प्रश्न : सहकारी दूध व्यवसायासमोर खासगीचे आव्हान आहे. याबाबत तुमचे मत काय?उत्तर : अलीकडे दूध व्यवसायात खासगी व्यावसायिक उतरले आहेत. त्यामुळे सहकारातील लोकांनी व्यवसायाभिमुख होऊन काम करणे गरजेचे आहे. सहकार चळवळीला बळकट करण्यासाठी त्यांच्यावर लादलेल्या जाचक अटी, विशेषत: प्रदूषणाबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न करणार आहे. प्रश्न : दूध व्यवसायाला चालना देण्याबाबत तुमची काय तयारी आहे?उत्तर : दूध व्यवसाय वाढविण्यासाठी जातिवंत जनावरांची पैदास होणे गरजेचे आहे. आता ‘एनडीडीबी’, ‘अमूल’ची कृत्रिम रेतन केंद्रे आहेत. सहकाराच्या मालकीची अशी केंद्रे होण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. दूध व्यवसायाला बळकटी देण्यासाठी कमकुवत दूध संस्था व संघांना मदत करणे गरजेचे आहे. संचालकांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रवाहात आणावे लागणार आहे. देशाचा दूध व्यवसाय अद्ययावत करण्याबरोबरच तो बळकट करावा लागणार आहे. प्रश्न : ‘गोकुळ’मुळे तुम्ही येथपर्यंत पोहोचला; पण ‘अमूल’च्या प्रवेशाने त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का?उत्तर : खरे आहे. माझ्या जडणघडणीत ‘गोकुळ’चे फार मोठे योगदान आहे; किंबहुना ‘गोकुळ’मुळेच अरुण नरकेंची ओळख देशभर झाली. ‘अमूल’चे आव्हान कोणीही नाकारू शकत नाही. त्यांना थोपविण्याची जबाबदारी माझी आहे. ज्या संस्था चांगल्या चालल्या आहेत, तिथे ‘अमूल’ने हस्तक्षेप करू नये, अशी विनंती आपण पार्थिव भटोर यांच्याकडे केली आहे. ते माझा शब्द मोडतील, असे वाटत नाही.- राजाराम लोंढे
सहकार दूध व्यवसाय बळकट करणार
By admin | Published: January 13, 2017 12:17 AM