कोल्हापूर : पन्हाळा-बावडा मतदारसंघाच्या गेल्या ४0 वर्षांच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले दादा-कोरे गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी आमदार विनय कोरे यांनी दिवंगत नेते माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचा मुलगा अमर यांच्याशी राजकीय मैत्रीचा हात पुढे केला आहे. अमर पाटील हे या दिलजमाईसाठी सकारात्मक असले तरी त्यांच्या गटातून त्यासंबंधीचा निर्णय होत नसल्याने घडामोडी थंडावल्या आहेत. पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवायचा असेल, तर पन्हाळ्यात मतविभागणी होता कामा नये, असे विनय कोरे यांना वाटते. तोच या घडामोडींचा गाभा आहे.
कोडोली व सातवे जिल्हा परिषद मतदारसंघात जुन्या दादा गटाची आजही चांगली ताकद आहे; त्यामुळे तिथे कोरे गट अमर पाटील यांच्या पाठीशी राहील. जिल्हा बँकेच्या राजकारणातही अमर यांना कोरे गट बळ देईल. त्यांनी विधानसभेला कोरे यांना मदत करावी, असा हा मूळ प्रस्ताव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अमर पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवून २८ हजार मते मिळवली आणि याच निवडणुकीत विनय कोरे हे शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांच्याकडून अवघ्या ३८८ मतांनी पराभूत झाले. आमदार पाटील यांना शाहूवाडीत त्या तालुक्याचे आमदार म्हणून सहानुभूती मिळते आणि पन्हाळ्यातील मतविभागणीचा फायदाही मिळतो; त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील मतविभागणी टाळली तर विजय खेचून आणता येईल, असे कोरे यांचे गणित आहे.
अमर पाटील हे जिल्हा परिषदेच्या सातवे मतदारसंघातून काँग्रेसकडून रिंगणात होते; परंतु तिथे त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षाच्या शिवाजी मोरे यांनी ११२० मतांनी पराभव केला. तिथेही अमर यांना १२ ५९३ मते मिळाली आहेत. आता त्यांच्याकडे सर्वोदय सोसायटी, कोडोली अर्बन बँक, कोडोली पतसंस्था या प्रमुख संस्था असल्या तरी जिल्हा पातळीवरील सत्तेचे पद नाही. विधानसभेला विजय मिळवण्याइतकी या गटाची आता ताकदही राहिलेली नाही; त्यामुळे दुसऱ्याला पराभूत करण्यासाठीच मी किती वर्षे निवडणूक लढवायची, अशी भावना अमर पाटील यांची झाली आहे.
यशवंतदादा यांचे वारसदार म्हणून अमर पाटील व डॉ. जयंत पाटील या दोघांना दादा गटात महत्त्व आहे; परंतु या चुलत्या-पुतण्यांमध्ये कौटुंबिक व राजकीयही फारसे सख्य नाही. किंबहुना त्यांची राजकीय भूमिका परस्परविरोधीच राहण्याची चिन्हे आहेत; त्यामुळे अमर पाटील यांनी कोरे गटाबरोबर जुळवून घेतले, तरी डॉ. जयंत पाटील हे त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता नाही. त्यांचे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांचे सख्य आहे आणि भारत पाटील यांची पुन्हा कोरे यांच्यासोबत जाण्याची इच्छा नाही.
या मतदारसंघात आता दोन्ही काँग्रेसकडे लढण्यासाठी उमेदवारच नाही; त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर असलेल्या संबंधाचा वापर करून डॉ. जयंत पाटील हे रिंगणात उतरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कोरे गटांकडून अमर पाटील यांच्याशी जशी चर्चा सुरू आहे, तशाच गाठीभेटी डॉ. जयंत पाटील यांच्याशीही सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी डॉ.पाटील यांची त्यांच्या कोडोलीतील शिक्षण संस्थेत येऊन भेट घेतली आहे.
अमर पाटील यांचा परवाच्या २१ तारखेला वाढदिवस झाला. निवडणूक तोंडावर असल्याने यंदाचा वाढदिवस दणक्यात साजरा करून त्यांनी गटाची चाचपणी केली. वाढदिवसाला जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी पाहून त्यांनाही नवा हुरूप आला आहे. या वाढदिवसाला आमदार सत्यजित पाटील यांनी उपस्थित राहून अमर यांना केकही भरवला. त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या.दादा गटाची निर्णायक ताकददादा गटांवर प्रेम करणाºया कार्यकर्त्यांचे काही झाले तरी किमान २५ हजारांचे पॉकेट नुसत्या पन्हाळा तालुक्यात आहे. अटीतटीच्या लढतीत राजकीय ताकद निर्णायक ठरणारी असल्यानेच ‘दादा’ गटाला पुन्हा महत्त्व आले आहे.