देवाळे : आरळे (ता. पन्हाळा) येथील सर्जेराव तुकाराम घाटगे (वय ७०) व सदाशिव तुकाराम घाटगे (वय ५५) या दोन सख्ख्या भावांचा दोन आठवड्यात कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे घाटगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घाटगे कुटुंबातील चार भावांपैकी सदाशिव घाटगे या सर्वात मोठ्या व सर्जेराव घाटगे या सर्वात लहान भावांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोडोली येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दोघेही कोरोनावर मात करुन घरी येतील, असे सर्वांना वाटत होते. मात्र, सर्जेराव यांची प्रकृती बिघडत गेली व त्यांचा मृत्यू झाला.
सर्जेराव यांच्या मृत्यूचे दुःख उराशी बाळगत सदाशिव यांना वाचविण्यासाठी कुटुंबीयांचे प्रयत्न सुरू होते. सदाशिव यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना कोडोलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर आठ-दहा दिवस उपचार सुरू होते. येथून त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. याठिकाणी उपचारादरम्यान दि. ६ जून रोजी सदाशिव यांचा मृत्यू झाला. छोट्या भावाच्या उत्तरकार्यादिवशीच मोठ्या भावाला मृत्यूने गाठल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, ऑक्सिजनचाही तुटवडा आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे.
०७ सर्जेराव घाटगे
०७ सदाशिव घाटगे